प्रत्येक स्थानकावर भटक्या कुत्र्यांसाठी नोडल अधिकारी नियुक्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वेर्स्टन रेल्वेने (Western Railway) प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत मुंबई विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर स्टेशन अधीक्षक आणि स्टेशन मास्टर (प्रभारी) यांची भटक्या कुत्र्यांच्या समस्येसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

हा निर्णय सर्वोच्च न्यायालय, रेल्वे बोर्ड आणि पश्चिम रेल्वे मुख्यालयाच्या निर्देशांनुसार घेण्यात आला आहे. स्थानकांवरील भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या घटनांना आळा घालणे आणि प्रवाशांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा त्यामागील उद्देश आहे.

नोडल अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या

मुंबई सेंट्रल येथील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांनी जारी केलेल्या आदेशानुसार, प्रत्येक स्थानक प्रमुखाला पुढील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील:

  • स्थानक परिसरातील भटक्या कुत्र्यांवर नियमित देखरेख ठेवणे.

  • महापालिकेसह समन्वय साधून कुत्र्यांचे नियंत्रण आणि स्थलांतराची कार्यवाही करणे.

  • प्लॅटफॉर्म आणि स्थानक परिसरात प्राणी प्रवेश करू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे.

  • नियमित तपासणी करून आवश्यक कारवाई करणे.

  • केलेल्या कारवाईची नोंद ठेवून विभागीय कार्यालयाला अहवाल सादर करणे.

  • रेल्वे बोर्ड आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे.

प्रवाशांसाठी संपर्क माहिती उपलब्ध

प्रवाशांना तक्रार करणे सोपे व्हावे यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक प्रत्येक स्थानकाच्या प्रवेशद्वारावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांबाबतची तक्रार प्रवासी थेट संबंधित अधिकाऱ्यांकडे करू शकतील.

सुरक्षित आणि स्वच्छ स्थानकांचा उद्देश

या उपक्रमामुळे महापालिकेशी समन्वय अधिक प्रभावी होईल. तक्रारींवर जलद कारवाई करता येईल आणि मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल, असा पश्चिम रेल्वेला विश्वास आहे. या निर्णयामुळे स्थानके अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि प्रवाशांसाठी अनुकूल बनवण्यास मदत होणार आहे.


हेही वाचा

नवी मुंबई: 'या' 34 धोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करण्याचे आदेश

पुढील बातमी
इतर बातम्या