मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान गुरुवारी दुपारी सांताक्रूझ (पश्चिम) येथे झाड कोसळून आठ जण जखमी झाले. ही घटना दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास रिलीफ रोड परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जवळील एका खासगी पुनर्विकास प्रकल्पाच्या परिसरातील एक झाड यापूर्वीच कोसळले होते. त्या घटनेची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नगरसेविका हेतल गाला घटनास्थळी गेले होते. पाहणी सुरू असतानाच अचानक आणखी एक मोठे झाड कोसळले आणि अनेक जण त्याखाली अडकले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महापालिका कर्मचारी, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. झाडाखाली अडकलेल्या सर्व आठ जणांना बाहेर काढून नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
सलग घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
काही दिवसांपूर्वीच चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने 11 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता सांताक्रूझमधील ही घटना घडल्याने मुंबईतील जुन्या आणि धोकादायक झाडांच्या सुरक्षिततेबाबत तसेच पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या झाडांच्या पाहणी आणि देखभालीच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, बृहन्मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, गुरुवारी दिवसभरातील मुसळधार पावसादरम्यान शहरात झाडे किंवा फांद्या कोसळल्याच्या 91 तक्रारी, शॉर्टसर्किटच्या 9 घटना आणि घर किंवा भिंत अंशतः कोसळल्याच्या 4 घटनांची नोंद झाली आहे.
सतत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा