मुंबई लोकल सर्वांसाठी १ फेब्रुवारीपासून होणार सुरू?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबईची लाईफलाइन लोकल सेवा आता लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक स्तरावर याबाबत चर्चा सुरू होत असून,  सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व संबंधितांची बैठक घेतल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. शिवाय, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीसुद्धा याबाबत महत्त्वाची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे.

अस्लम शेख यांच्यासोबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही तशाचप्रकारचे विधान केले आहे. महाराष्ट्रात गेल्या १० महिन्यांपासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला त्याचवेळी मुंबईची लाइफलाइन असलेल्या उपनगरीय लोकल रेल्वे सेवेलाही ब्रेक लागला. त्यानंतर विशेष लोकल सेवा सुरू करून टप्प्याटप्प्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वकील, खासगी सुरक्षा रक्षक आणि महिला प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी मिळाली आहे.

सर्वांसाठी लोकल खुली करण्याबाबत निर्णय सातत्याने लांबणीवर पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याने लोकलसेवा सर्वांसाठी खुली करण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली होती.

या बैठकीला राज्य सरकारचे सर्व संबंधित अधिकारी, मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पोलीस आयुक्त परमबीर सिंग, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांचे महाव्यवस्थापक उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी लोकलसेवा सर्वांसाठी लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर रेल्वेस्तरावर हालचालींना वेग आला आहे. २९ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेने पूर्ण क्षमतेने म्हणजे लॉकडाऊन आधी जितक्या लोकल धावत होत्या तितक्या लोकल रुळावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडी घडत असतानाच पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज महत्त्वाची माहिती दिली व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लोकलसेवा पूर्ववत सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गांवर लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येत आहेत. ती बाब ध्यानात घेऊन राज्य सरकारने अॅक्शन प्लान तयार केला आहे. तशी मार्गदर्शक तत्वेही (SOP) आम्ही निश्चित केली आहेत.

लोकलसेवेचे वेळापत्रक निश्चित केले जाईल, असे शेख यांनी सांगितले. तर येत्या २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून लोकल सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय जाहीर होऊ शकतो, असा विश्वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. लोकल सर्वांसाठी सुरू झाल्यास करोनाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील.

सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझर याबाबत कोणतीही कुचराई करून चालणार नाही, असे पेडणेकर यांनी नमूद केले. लोकल सुरू होणार असल्याचे कळत असल्याने याअनुषंगाने चर्चा करण्यासाठी आयुक्तांसोबत एक बैठकही आयोजित केली असल्याचे पेडणेकर यांनी नमूद केले.

पुढील बातमी
इतर बातम्या