महापौरांच्या कार्यालयालाच गळती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गरिबांच्या झोपड्यात आणि जुन्या चाळी, इमारतींमधील घरांमध्ये पावसाळ्यात गळती लागल्याचे आपण ऐकत असतो. पाहत असतो, परंतु मुंबईचे महापौर यांच्या कार्यालयात तर ऐन उन्हाळ्यातच गळती लागली आहे. महापौरांच्या कार्यालयात पाण्याची लागलेली गळती अर्थात वातानुकूलित यंत्रणातील तांत्रिक दोषामुळे लागली आहे. मात्र, ही गळती काही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना थांबवता आलेली नाही. त्यामुळे आधीच महापौरांचा बंगला गेला आहे, आता तर काय त्यांच्या दालनालाच गळती लागल्यामुळे नव्या महापौरांना मोठ्या दिव्यातून जात मुंबईचा कारभार हाकावा लागणार असल्याचे दिसते. 

मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनासहित आता महापौरांच्या दालनालाही गळती लागलेली आहे. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांची महापालिकेतील सर्वोच्च पदे आहेत. परंतु महापौरांसह स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाला लागलेली ही गळती थांबता थांबत नसून, नक्की कुठून काय भगदाड पडलेय आणि कुठून काय निसटलेय याचाच शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारतीचे नुतनीकरण सुरू असून, जुन्या इमारतीतील सर्वच मजल्यांवरील कार्यालयांचे नूतनीकरण झालेले आहे. यामध्ये महापौरांच्या कार्यालयासह उपमहापौर, स्थायी समिती यांच्यासह सर्व वैधानिक आणि विशेष समिती आणि पक्षांच्या कार्यालयांचे नूतनीकरण झाले आहे. आतापर्यंत तब्बल 70 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 2009 पासून सुरू असलेले हे काम अद्यापही सुरूच आहे. सध्या नवीन विस्तारीत इमारतींच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, जुन्या हेरिटेज इमारतीतील काम पूर्ण झाले आहे. परंतु महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही गळती लागलेली आहे. वातानुकूलित यंत्रणेतील तांत्रिक दोषामुळेच ही पाण्याची गळती लागलेली आहे. परंतु गळतीचा शोध घेऊन त्याची दुरुस्ती करण्यात कंत्राट कंपनी आणि महापालिकेच्या देखभाल विभागाला यश आलेले नाही.

स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनासह महपौर दालनांमध्ये वातानुकूलित यंत्रणा ही वरील बाजूस बंदीस्त केल्यामुळे यातील पाणी छपराला भगदाड पडल्याप्रमाणे गळू लागले आहे. स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनात मागील महिन्यात अशाप्रकारे गळती लागल्यावर बादली ठेवून जमिनीवर पसरणारे पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळीही महापौरांच्या दालनात अशाचप्रकारे गळती लागली. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी बादली आणि वर्तमानपत्रांचे पेपर पसरवून हे पाणी पसरू दिले नाही. महापौर दालनात लोकांची गाऱ्हाणे ऐकून घेत असतानाच ही गळती लागली होती. या गळतीबाबत खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही अशाप्रकारे गळती लागली होती. त्यावेळी पुन्हा गळती होणार नाही,अशी ग्वाही दिली होती. परंतु आज पुन्हा ही गळती लागल्यामुळे या कामाबाबतच त्यांनी शंका उपस्थित केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या