मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची 'हात जोडून विनंती'; ''म्हणाल्या...''

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र असं असलं तरी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हात जोडून मुंबईकरांना एक विनंती केली आहे. शिवाय, व्हिडीओच्या माध्यमातून महापौरांनी रुग्णसंख्या कमी होत असल्याचा संदर्भ देत लसीकरणाचं महत्व सांगितलं. मुंबईमध्ये मंगळवारीही दैनंदिन रुग्णसंख्येत घट नोंदविण्यात आली आहे. दिवसभरात ११ हजार ६४७ नवे रुग्ण आढळले, तर त्याहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले.

'मुंबईमध्ये कोरोनाचा आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा कमी होताना दिसतोय. मुंबईकरांना मी विनंती करेन की प्रत्येकाने लस घ्या. लस घेणाऱ्यांना जरी त्याचा प्रादुर्भाव झाला तरी तो सौम्य आहे. कारण २०२१ च्या फेब्रुवारीपासून ते अगदी या चालू आठवड्यापर्यंत एकूण मृतांपैकी ९४ टक्के रुग्ण हे लस न घेणारे आहेत. म्हणूनच जास्त काळजी वाटते. प्रत्येक मुंबईकराने लस घ्यावी अशी विनंती करते. लसवंत व्हा. लस घेतलेल्यांपैकी जास्तीत जास्त रुग्ण हे वाचवण्याकडे तसेच त्यांच्या माध्यमातून प्रादुर्भाव कमी करण्याकडे असणार कल अधिक आहे', असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं

मुंबईत रुग्णसंख्येबरोबरच बाधितांच्या प्रमाणातही घट नोंदविण्यात आली आहे. सोमवारी शहरात १३,६४८ रुग्ण आढळले आणि बाधितांचे प्रमाण २३ टक्के होत़े  मंगळवारी रुग्णसंख्या ११,६४७ होती आणि बाधितांचे प्रमाण १८ टक्के नोंदविण्यात आले. एका दिवसात रुग्णसंख्येत १४ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

मुंबईत मंगळवारी आढळलेल्या ११ हजार ६४७ रुग्णांपैकी ८५१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील ७६ रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता भासली. एका दिवसात रुग्णालयातील ९६६ खाटा रिक्त झाल्या आहेत.

ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असला तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे शहरात प्रतिबंधित इमारतींच्या संख्येतही घट होत असून, सध्या ६३ इमारती प्रतिबंधित आहेत. शहरातील एकही झोपडपट्टी प्रतिबंधित नाही.

मुंबईत तिसऱ्या लाटेमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांच्या घरात पोहोचली असली तरी गेल्या दोन आठवड्यात मृतांचे प्रमाण कमी राहिले आहे. मागील २२ दिवसांत ४६ जणांचा मृत्यू झाला असून दरदिवशी सरासरी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील ८० टक्के खाटा रिक्त असून रुग्णसंख्याही कमी होत आहे. त्यामुळे घाबरू नये, परंतु सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.

राज्यात मंगळवारी दिवसभरात ३४ हजार ४२४ करोना रुग्णांचे निदान झाले. १८ हजार ९६७ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतल़े ओमायक्रॉनच्या ३४ रुग्णांचे निदान झाले. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी करोनाबाधितांचा आकडा ३० हजारांच्या आसपास स्थिरावला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या