स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य हल्ल्यांची चेतावणी देणारा बॉम्बस्फोटाचा धमकीवजा ईमेल मुंबईच्या (mumbai) महापौर रितू तावडे (ritu tawde) यांच्या अधिकृत खात्यावर आली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, या धमकीवजा ईमेलमध्ये 15 ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.
यात महापौर कार्यालय, बीएमसी मुख्यालय, मुंबई मेट्रो स्थानके, शाळा आणि शेअर बाजार यांसारख्या अनेक संभाव्य ठिकाणांचा उल्लेख होता.
या संदेशात खलिस्तान-समर्थक घोषणा आणि काही व्यक्तींची नावेही होती. तसेच, मुलांना शाळेत न पाठवण्याचा किंवा मेट्रोचा वापर न करण्याचा इशाराही यात देण्यात आला होता.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या ईमेलमध्ये विशेषतः मुंबईतील जनजीवन विस्कळीत करण्याबाबत आणि 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आणण्याबाबत उल्लेख करण्यात आला होता.
"ईमेलमध्ये म्हटले आहे की, मुंबई आणि 15 ऑगस्टचे कार्यक्रम रोखण्याची त्यांची योजना आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत," असे अधिकाऱ्याने सांगितले.
या धमकीनंतर, मुंबई पोलिसांनी (mumbai police) 'बॉम्ब शोधक व नाशक पथक' (BDDS) आणि श्वान पथकांसह महापालिका (bmc) मुख्यालय, महापौर कार्यालय आणि ईमेलमध्ये नमूद केलेल्या इतर ठिकाणी व्यापक शोध मोहीम राबवली.
खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या प्रमुख आस्थापनांवर सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
प्रशासनाने बीएमसी मुख्यालयात प्रवेशासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत, जिथे अभ्यागतांची आत जाण्यापूर्वी कसून तपासणी केली जात आहे.
अधिकाऱ्यांनी पालिकेच्या इमारतीमध्ये अनावश्यक गर्दी करण्यासही मनाई केली आहे. सुरक्षेची कार्यवाही सुरळीत पार पाडण्यासाठी, कोणतेही अधिकृत काम नसलेल्या व्यक्तींना परिसराबाहेर जाण्यास सांगितले जात आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बीएमसी मुख्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसून आला, तर बॉम्ब शोधक पथकांनी प्रशासकीय इमारतीच्या आत सखोल तपासणी केली.
पोलिसांनी ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. सायबर गुन्हे विभागाचे अधिकारी ईमेलचा आयपी (IP) ॲड्रेस, स्रोत आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी करून तो कुठून आला आहे, याचा शोध घेत आहेत.
ही नवीन धमकी महापौर कार्यालयाला यापूर्वी आलेल्या ईमेलशी संबंधित आहे का, याचीही पडताळणी अधिकारी करत आहेत.
"अशी धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाठवणारी व्यक्ती तीच आहे का, याची आम्ही खात्री करत आहोत आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला आलेला हा बॉम्बस्फोटाच्या धमकीचा तिसरा ईमेल आहे. यापूर्वी, 10 जून रोजी अशाच प्रकारच्या धमक्यांमुळे प्रशासनाने बीएमसी (BMC) मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था वाढवली होती.
त्या घटनेनंतर, महत्त्वाच्या प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर्स बसवण्यात आले, अभ्यागतांची तपासणी अधिक कडक करण्यात आली आणि महापालिका मुख्यालयातील संवेदनशील भागांमध्ये प्रवेश मर्यादित करण्यात आला.
जूनमधील त्या धमकीमध्ये बीएमसी मुख्यालय, महापौरांचे कार्यालय आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) यांचाही उल्लेख होता; त्यामुळे पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून सखोल तपासणी करण्यात आली होती. त्या मोहिमेदरम्यान कोणतीही स्फोटके आढळली नाहीत.
तपास सुरू असतानाच, मुंबई पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे किंवा अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, धमकीत नमूद केलेल्या सर्व ठिकाणांची सखोल तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा यंत्रणा हाय-अलर्टवर आहेत, तसेच धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
हेही वाचा