बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे जुलै महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी, मोफत फीडर बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ॲक्वा लाईन (मेट्रो लाईन ३) प्रवाशांसाठी 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' अधिक सक्षम करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), डब्ल्यूआरआय इंडिया आणि बीकेसी मूव्ह्स यांच्या संयुक्त विद्यमाने 'पब्लिक ट्रान्सपोर्ट डे' निमित्त या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत खासगी बस सेवा कंपनी सिटीफ्लो बीकेसी मेट्रो स्थानकापासून बीकेसीतील प्रमुख व्यावसायिक आणि कार्यालयीन परिसरांपर्यंत प्रवाशांसाठी विनामूल्य फीडर बस सेवा चालवणार आहे.
महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारी सेवा
ही फीडर बस बीकेसी मेट्रो स्थानकाच्या प्रवेश/निर्गम (Entry/Exit) A1 आणि A2 येथून उपलब्ध असेल. या बसद्वारे जिओ वर्ल्ड प्लाझा, वन बीकेसी, जेटवन एमएमआरडीए, कलानगर, बीडीबी गेट क्रमांक 7, आयसीआयसीआय बस स्टॉप आणि क्रेसेन्झो या प्रमुख ठिकाणांना जोडले जाणार आहे.
ही परिपत्रक (सर्क्युलर) बस सेवा बीकेसीमध्ये कामासाठी किंवा अन्य कारणांसाठी येणाऱ्या मेट्रो प्रवाशांचा पुढील प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
मेट्रो लाईन 3 मुळे बीकेसीला अधिक चांगली जोडणी
बीकेसी हे मुंबईतील सर्वात मोठ्या व्यावसायिक केंद्रांपैकी एक असून येथे दररोज हजारो कर्मचारी आणि नागरिक ये-जा करतात. मेट्रो लाईन 3 मुळे उत्तरेतील आरे-जेव्हीएलआरपासून ते दक्षिण मुंबईतील कफ परेडपर्यंत बीकेसीला थेट जोडणी मिळाली आहे.
याशिवाय, या मार्गावर मारोल नाका येथे मेट्रो लाईन 1 शी इंटरचेंजची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सीएसएमटी, चर्चगेट, दादर, ग्रँट रोड, महालक्ष्मी आणि माहीम या उपनगरी रेल्वे स्थानकांशीही जोडणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ पर्यंत थेट पादचारी मार्गाची सुविधाही या मार्गावर उपलब्ध आहे.
आयोजकांच्या मते, 'पब्लिक ट्रान्सपोर्ट डे' उपक्रमाचा उद्देश एकात्मिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे, फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारणे, वाहतूक कोंडी कमी करणे आणि खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवून कार्बन उत्सर्जन कमी करणे हा आहे.
कॉर्पोरेट पास योजनेचीही घोषणा
यासोबतच सिटीफ्लोने बीकेसीमधील कंपन्यांसाठी 'कॉर्पोरेट पास' योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बस सेवा चालवण्याऐवजी 'पे-पर-यूज' तत्त्वावर सिटीफ्लोची बस सेवा उपलब्ध करून देऊ शकतात.
या योजनेत कंपन्यांना सवलतीच्या दरात कॉर्पोरेट पास दिले जातील आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष केलेल्या प्रवासानुसारच बिल आकारले जाईल. कर्मचारी सिटीफ्लोच्या मोबाईल अॅपद्वारे बसमधील जागा आरक्षित करू शकतील. तसेच कंपन्या कर्मचाऱ्यांना किती प्रवास भाडे अनुदान द्यायचे, हे स्वतः ठरवू शकतील आणि आवश्यकतेनुसार त्यात बदलही करू शकतील.
सिटीफ्लोच्या म्हणण्यानुसार, या मॉडेलमुळे कंपन्यांना स्वतंत्र बस चालवण्याचा किंवा किमान प्रवासी संख्या राखण्याचा खर्च टाळता येईल. कर्मचाऱ्यांना वातानुकूलित बस, आरक्षित आसन, नियोजित वेळापत्रक आणि लाईव्ह ट्रॅकिंगसारख्या सुविधा मिळतील.
या उपक्रमामुळे कंपन्यांचा कर्मचारी वाहतूक खर्च सुमारे 30 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. तर कर्मचाऱ्यांचा कॅबने प्रवास करण्याचा खर्चही 60 टक्क्यांपर्यंत घटू शकतो, असा दावा सिटीफ्लोने केला आहे.
सिटीफ्लोचे सहसंस्थापक आणि कॉर्पोरेट विभागप्रमुख संकल्प केळशीकर म्हणाले, "बीकेसीमधील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहन द्यावे, या उद्देशाने आम्ही 'कॉर्पोरेट पास' योजना सुरू केली आहे. बीकेसीशी जोडलेल्या बहुतांश निवासी भागांमध्ये आमची सेवा आधीच उपलब्ध असून, मागणीनुसार काही दिवसांत नवीन मार्गांवरही सेवा सुरू करता येईल."
हेही वाचा