नायर रुग्णालयातील एमआरआय सेंटर दुघर्टनेला वरिष्ठही जबाबदार!

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

नायर रुग्णालयातील एमआरआय सेंटरमध्ये रुग्णासोबत गेलेल्या राजेश मारू या तरुणाच्या मृत्यूला २५ दिवस उलटले, तरी या घटनेबाबत प्रशासन संवेदनशील नसल्याने महापालिका सभागृहात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेप्रकरणी ३ कर्मचाऱ्यांना अटक झाली असली तरी याला रुग्णालयाचे वरिष्ठही तेवढेच जबाबदार असल्याने त्यांच्यावरही कारवाई केली जावी, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.

अजूनही मदत नाही

या प्रकरणात मृत राजेश मारू यांच्या कुटुंबाला ना आर्थिक मदत मिळाली, ना महापालिका सेवेत त्याच्या नातेवाईकाला सामावून घेतले, असं म्हणत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेबाबत चिंता व्यक्त केली.

याप्रकरणी अटक झालेल्या आरोपींना सोडवण्यासाठी महापालिकेने वकील उपलब्ध करून दिले, त्याबद्दलही त्यांनी चिड व्यक्त केली. याला पाठिंबा देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी रुग्णालयातील सर्व यंत्रसामृग्रीचे ऑडीट करण्याची मागणी केली. भाजपाच्या श्रीनिवास त्रिपाठी यांनी कर्मचाऱ्यांवर असलेल्या तणावामुळेच अशा घटना घडत असल्याचे सांगितलं.

सईदा खान यांचा गौप्यस्फोट

महापालिकेच्या सर्व रुग्णांमध्ये सर्वप्रकारची सुविधा आहेत. फक्त डॉक्टर्ससह नर्स, आयामावशींनी जर एकत्रपणे येत काम केलं तर कुठेही अशाप्रकारच्या घटना घडणार नसल्याचं डॉ. सईदा खान यांन सांगितले. यावेळी त्यांनी नर्स, वॉर्डबॉय आणि आया मावशी या हजेरी नोंदवून आपल्या दिलेल्या वॉर्डात काम करायला जात नाही. त्यांची हजेरी तर लागते, परंतु त्यांच्या ऐवजी खाडाबदली कामगार काम करतात, असा गौप्यस्फोट खान यांनी केला. तसेच महापालिका रुग्णालयात जेवढे एमआरआय मशिन आहेत, त्यासर्वांच्या परिसरात रेड झोन तयार करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.

'यांचा सत्कार करा'

नायर रुग्णालयात ही दुर्दैवी घटना घडली असली तरी याच रुग्णालयाने दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया करून सर्वात मोठा ट्युमर काढला. त्यामुळे या डॉक्टरांच्या टीमचा महापालिका सभागृहात सत्कार करण्याची मागणी दिलीप लांडे यांनी केली. यावर प्रशासनाकडून अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी पुढील बैठकीत अधिक माहिती सादर केली जाईल, असं आश्वासन दिलं. 

असुविधांचा वाचला पाढा

यावेळी झालेल्या चर्चेत प्रकाश गंगाधरे, मेहेर हैदर, हरिष छेडा आदींनी भाग घेत आरोग्य व्यवस्थेचा गैरकारभाराचा आणि असुविधांचा पाढाच वाचत मारू यांच्या नातेवाईकाला महापालिका सेवेत सामावून घेण्याची सूचना केली.

पुढील बातमी
इतर बातम्या