६२ हाॅटेल-रेस्टाॅरंट्सला ठोकले सील, पालिकेकडून ५ हजार ४६९ हाॅटेल्सची तपासणी

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • सिविक

कमला मिल कंपाऊंड अाग प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या मुंबई महानगरपालिकेने महिन्याभरात अग्निसुरक्षा मोहिमेअंतर्गत तब्बल ५ हजार ४६९ हाॅटेल-रेस्टाॅरन्ट्सची तपासणी केली आहे. त्यानुसार अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६२ हाॅटेल-रेस्टाॅरन्ट्सला ठाळे ठोकले अाहे. तर मुंबई महापालिकेने १ हजारापेक्षा अधिक हाॅटेल-रेस्टाॅरन्टमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला अाहे. या कारवाईदरम्यान ३ हजाराहून अधिक हाॅटेल-रेस्टाॅरन्ट्सचा तपासणी अहवाल सादर करत त्यांना आवश्यक त्या सुधारणा त्वरीत करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या महिन्याभराच्या कारवाईत पालिकेने अनधिकृतपणे साठवून ठेवलेले १ हजार ९६५ गॅस सिलेंडरही जप्त केले आहेत.

५२ स्वतंत्र टीम्सनी केली तपासणी

या मोहिमेसाठी २४ विभागांसाठी ५२ स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या होत्या. प्रत्येक टीममध्ये मुंबई अग्निशमन दल, सार्वजनिक आरोग्य खाते, इमारत व कारखाने खाते तसंच अतिक्रमण निर्मूलन खाते या खात्यांमधील अधिकाऱ्यांचा अाणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या टीमकडून २४ विभागांमधील उपहारगृह, सिनेमागृह, नाट्यगृह, माॅल्स, गोदाम, रुग्णालय, नर्सिंग होम अशा अास्थापनांची तपासणी करण्यात आली.

अनधिकृत बांधकामांसाठी नोटीसा बजावल्या

या तपासणीत अग्निसुरक्षाविषयक अटींची पूर्तता योग्य प्रकारे केली जात अाहे की नाही, याची खातरजमा करत अनधिकृत बांधकाम तोडण्याबरोबर त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, या महिन्याभरात मुंबई अग्निशमन दलातील ३४ अग्निशमन केंद्रासाठी एकूण ३४ अग्निसुरक्षा पालन कक्ष सुरू करण्यात आले. पालिका क्षेत्रातील अास्थापनांद्वारे अग्निसुरक्षा विषयक अटींची पूर्तता योग्य प्रकारे होत आहे का, याची तपासणी या कक्षामार्फत केली जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या