मुंबईत मान्सूनचा जोर वाढत असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) शहर आणि मुंबई महानगर प्रदेशासाठीचा पावसाचा इशारा ऑरेंज अलर्टवरून रेड अलर्टमध्ये वाढवला आहे.
पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
हवामान विभागाने मुंबईत पुढील काही तास अतिमुसळधार पावसासह ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांसाठी तातडीच्या सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत.
महापालिकेने अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि मुसळधार पावसाच्या काळात प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. तसेच झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, वीज खांब, पाणी साचलेले भाग आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जोरदार वारे आणि पावसामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांनी आपली वाहने झाडाखाली उभी करू नयेत. तसेच समुद्रकिनारे, चौपाट्या आणि सखल भागांमध्ये जाणे टाळावे, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. हवामान आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबतची माहिती केवळ अधिकृत सरकारी माध्यमांतूनच घ्यावी आणि प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.