मुंबई आणि उपनगरांमध्ये मागील पडणाऱ्या जोरदार पावसामुळे राज्य सरकारने मंगळवारी २ जुलै रोजी सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे. मुंबई आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. मुंबई महानगर पालिकेच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.
मागील ४ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. त्याचप्रमाणं मंगळवारी होणाऱ्या महाविद्यालयीन परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. त्यामुळं परीक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी करू नका असं उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
या पावसाचा फटका मुंबईतील रेल्वे सेवेला बसला आहे. मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे. अनेक भागांत रेल्वे रुळांजवळ पाणी साचल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसानं जोर धरला आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झालेला पाहायला मिळतो आहे.