मुंबईकर रात्रभर भरकटले

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सकाळपासून झोडपून काढणाऱ्या पावसाने मुंबईकरांना अक्षरश: भरकटून टाकले. मोठ्याप्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता कार्यालये दुपारीच सोडली. परंतु नेमक्या त्याचवेळी गाड्या बंद असल्यामुळे अनेकांना पायपीट करत घर गाठावे लागले. तर काहींनी सुरक्षित ठिकाणी राहणे तर पसंत केले, परंतु गाड्या सुरू झाल्याची बातमी ऐकताच रेल्वे स्थानकाच्या दिशेन धाव घेतली. पण प्रत्यक्षात गाड्याच सुरू नसल्यामुळे रात्रभर भरकटण्याची वेळ मुंबईकरांवर आली होती.

अडकलेल्या प्रवाशांना राजकीय पक्षांनी मदतीचा हात पुढे करण्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात रात्रीच्यावेळी प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. दादर पश्चिम भागात रात्री बारा वाजताही रस्त्यावर लोकांची गर्दी दिसून येत होती. घरी जाण्याच्या इर्षेने मुंबईकर रस्त्यांवरून चालताना दिसत होते. परंतु दादर रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ आणि २ वर रात्री बारावाजताही दोन ते अडीच फूट एवढे पाणी तुंबलेले होते. रेल्वे रुळाच्यावर एक फुटाएवढे पाणी तुंबले होते. पहिली विरार लोकल चर्चगेटहून बारा वाजता सोडण्यात आली. परंतु लोकांनी आधीपासून रेल्वे स्थानकावर धाव घेतल्यामुळे मोठ्याप्रमाणात गर्दी दिसून येत होती.

मुंबईत महापालिकेच्यावतीने ६० ते ६५ ठिकाणी शेल्टर उभारण्यात आले होते. महापालिकेच्या शाळांसह अन्य जागांमध्ये हे निवारा सेंटर उभारण्यात आले असले तरी सिद्धीविनायक मंदिर, लालबागचा राजा, दादरमधील गुरुद्वारासह अन्य खासगी संस्थांच्यावतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला. परंतु यामध्ये राजकीय पक्षांचे मदत केंद्र कुठेच दिसू शकले नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरासह अन्य भागात असणाऱ्या लोकांना कुठे जावे याचे योग्य मार्गदर्शन होत नसल्यामुळे लोक भरकटले जात होते. अनेक भागांमध्ये साचलेले पाणी आणि वीज पुरवठा खंडित केलेला असल्यामुळे अनेकांची तर भंबेरीच उडाली. मात्र, बऱ्याच प्रमाणात एनजीओ आणि एएलएम यांच्या स्वयंसेवकांनी योग्यप्रकारे खाद्यपुरवठा तसेच योग्य राहण्याच्या ठिकाणांची व्यवस्था केल्यामुळे अनेकांना दिलासा मिळत होता, तर काहींना योग्यप्रकारे मार्गदर्शन होत नसल्यामुळे ते भरकटले जात होते.

अनेकांनी आपल्या कार्यालयात राहणे पसंत केले तर काहींनी घरी जाणे पसंत केले. त्यामुळे लाखो प्रवासी यामध्ये अकडले असून सुमारे ३० हजारांच्या आसपास लोकांनी शेल्टरचा लाभ घेतल्याचे बोलले जात आहे.

मुंबईकरांना 'मनसे' प्रतिसाद

दादर पश्चिम भागात मनसेच्या महिला विभाग अध्यक्षा स्नेहल सुधीर जाधव यांच्यावतीने वडापावचे वाटप करण्यात आले. तर शिवाजी मंदिरासमोर खिचडीचे वाटप करण्यात आले होते. गाड्या बंद असल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता साडेबारानंतर मनसेच्यावतीने मार्गदर्शन केंद्र उभारुन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत होते.

मुंबईकरांना बुधवारी सुट्टी?

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच बुधवारीही मुसळधार पावसाची शक्यत लक्षात घेता शाळा आणि कॉलेज यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भात घोषणा केली आहे. परंतु जर अशाचप्रकारे परिस्थिती राहिल्यास बुधवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या