पुढचे 3-4 तास वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मान्सूनची प्रतीक्षा संपली असून वेळेआधीच मुंबईत दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. सर्वसामान्यपणे १० ते ११ जून दरम्यान मान्सून मुंबईत दाखल होत असतो. मात्र, यावर्षी दोन दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झालाय.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी नुकताच सावधगिरीचा इशारा जारी केला आहे. येत्या 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

“मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे,” IMD ने म्हटले आहे.

हवामान खात्याने लोकांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मान्सून सुरू झाल्यामुळे, सोमवारपर्यंत किनारपट्टी भाग म्हणजे कर्नाटक, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून (24 तासात 204 मिमी पेक्षा जास्त) 'रेड' अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील आठवड्यात या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहील. हे भाग मंगळवारपर्यंत ‘ऑरेंज’ अलर्टखाली राहतील.

रविवारी, पुणे (शिवाजीनगर) येथे 117 मिमी पावसाची नोंद झाली आणि 1969 नंतरचा जूनमधील हा तिसरा सर्वात ओला दिवस ठरला.

पुण्यातील लोहेगाव आणि परिघीय भागात गेल्या 24 तासांत 1398 मिमी पावसाची नोंद झाली आहे, असे IMD पावसाच्या आकडेवारीत दिसून आले आहे.

पुण्यात (शिवाजीनगर) जून महिन्यातील सरासरी पाऊस 156.3 मिमी आहे. शनिवारच्या मुसळधार पावसाने, शहराने मासिक सरासरी ओलांडली आहे आणि आता एकूण 209.1 मिमी (रविवारी सकाळी 8.30 पर्यंत) पाऊस पडला आहे. 

आसाम, मेघालय, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशसह ईशान्य भारत 10-13 जून दरम्यान अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा इशारा IMD ने दिला आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या