मुंबईत ४१० नवे रुग्ण; ४ जणांचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत सोमवारी ४१० नवे कोरोना रुग्ण आढळले असून, ४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. सोमवारी नव्यानं सापडलेल्या कोरोना रुग्णांमुळे बाधितांची एकूण संख्या ७ लाख ४८ हजार १६८ झाली आहे. तर सोमवारी ३५८ रुग्ण बरे झाल्यानं कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७ लाख २४ हजार ४२१ झाली आहे.

सध्या मुंबईत ५ हजार ७५ उपचाराधीन रुग्ण आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी २ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तसंच मृतांमध्ये चारही महिला होत्या. एका महिलेचे वय ४० वर्षांच्या खाली होते, तर ३ महिला ६० वर्षांवरील होत्या. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार ९६ दिवसांवर पोहोचला असल्याची माहिती मिळते.

सोमवारी मुंबईत २८ हजार ३१९ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण १ कोटी ७ लाख ५७ हजार ३५४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत ५६ इमारती प्रतिबंधित आहेत, तर बाधितांच्या संपर्कातील २ हजार ३५८ नागरिकांचा शोध सोमवारी घेण्यात आला, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यात सोमवारी २३२ कोरोना रुग्ण आढळले, तर, दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील २३२ करोना रुग्णांपैकी ठाणे ७१, कल्याण-डोंबिवली ४४, नवी मुंबई ३९, मीरा-भाईंदर २०, बदलापूर १८, उल्हासनगर १४, अंबरनाथ १०, ठाणे ग्रामीण १० आणि भिवंडीमध्ये सहा रुग्ण आढळून आले. तर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

पुढील बातमी
इतर बातम्या