उष्णतेमुळे मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत (mumbai) गेल्या महिनाभरात आगीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. निवासी इमारती, भंगार बाजार, वाहतूक केंद्रे आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये किमान 16 मोठ्या आगीच्या घटना समोर आल्या आहेत.

या घटनांमुळे वाढते तापमान (Temprature) आणि विजेचा (Electricity) वाढता वापर शहरातील आगीच्या धोक्याला कारणीभूत ठरत आहे का? याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये घडलेल्या या आगींमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दोन जण जखमी झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने बुधवारी नागरिक आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी सुरक्षा सल्ला जारी केला आहे.

विद्युत यंत्रणा, गॅस पाइपलाइन आणि अग्निशमन यंत्रणेची तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील प्रमुख आगीच्या घटना

  • 6 एप्रिल रोजी टी-20 विमानतळ मेट्रो स्थानकाच्या तांत्रिक कक्षात आग लागली.

  • 8 एप्रिल रोजी आरे येथील रॉयल पाम्स इस्टेटमध्ये लेव्हल-1 आग लागली. मुंबई अग्निशमन दलाने 22 हून अधिक रहिवाशांची सुरक्षित सुटका केली.

  • 9 एप्रिल रोजी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-१ येथे किरकोळ आग लागल्याने उड्डाणे उशिराने झाली आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

  • क्रॉफर्ड मार्केट, अनेक बस डेपो, भंगार बाजार आणि विविध व्यावसायिक आस्थापनांमध्येही आगीच्या घटना घडल्या.

  • 10 एप्रिल रोजी कामाठीपुरा 9व्या गल्लीतील आगीत 32 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

आगीत जखमी झालेल्या व्यक्ती

  • मंडाळा भंगार मार्केटमधील आगीत 25 वर्षीय शाहरुख खान गंभीर भाजला.

  • वडाळा पूर्वेतील संगम नगर येथील सलूनमध्ये लागलेल्या आगीत 65 वर्षीय मोहम्मद उमर जखमी झाले.

उन्हाळ्यात आगीचा धोका का वाढतो?

अग्निशमन अधिकाऱ्यांच्या मते, उन्हाळ्यात तापमान वाढल्याने एसी, पंखे आणि इतर थंडावा देणाऱ्या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे विजेच्या यंत्रणांवर ताण येतो आणि पुढील धोके वाढतात:

  • शॉर्ट सर्किट

  • विजेचा ओव्हरलोड

  • एसी यंत्रणांमध्ये बिघाड

  • उष्णतेमुळे उपकरणांचे नुकसान

जुनी किंवा योग्य देखभाल न केलेली विद्युत उपकरणे आणि एसी प्रणाली आगीचा धोका अधिक वाढवू शकतात, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

BMC आणि मुंबई अग्निशमन दलाचा सुरक्षा सल्ला

आगीच्या घटना टाळण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने नागरिक आणि व्यावसायिक आस्थापनांना पुढील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:

  • विद्युत वायरिंग, स्विचबोर्ड आणि प्लग पॉइंटची नियमित तपासणी करा.

  • पॉवर सॉकेट आणि एक्स्टेंशन बोर्डवर अतिरिक्त भार टाकू नका.

  • एसी आणि विद्युत उपकरणांची वेळोवेळी सर्व्हिसिंग करा.

  • एलपीजी सिलिंडर आणि गॅस पाइपलाइन अधिकृत तंत्रज्ञांकडून तपासून घ्या.

  • सुकलेली पाने, कचरा किंवा ज्वलनशील वस्तू उघड्यावर जाळू नका.

  • इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यरत आणि अद्ययावत ठेवा.

  • जिने आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे ठेवा.

  • अग्निशमन दलाच्या वाहनांना सहज प्रवेश मिळावा म्हणून वाहने फक्त निर्धारित ठिकाणीच पार्क करा.

  • गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक इमारतींमध्ये नियमित फायर सेफ्टी ऑडिट करा.

अग्निसुरक्षा तज्ज्ञांच्या मते, नियमित तपासणी आणि देखभालीमुळे अनेक घटना टाळता येऊ शकतात. इमारती आणि वैयक्तिक स्तरावर फायर ऑडिट करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे आग वेगाने पसरू शकते, विशेषतः ज्वलनशील वस्तू निष्काळजीपणे साठवलेल्या ठिकाणी किंवा गॅस गळतीच्या घटनांमध्ये धोका अधिक वाढतो, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक

आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी शांत राहून तात्काळ मुंबई अग्निशमन दलाशी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा:

  • 101

  • 022-23001990

  • 022-23001393

मुंबईत उष्णतेची लाटच पाहता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहून सर्व सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा

ठाणे: ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च’ उभारण्यास मंजुरी

वरळीतील G.M. भोसले रोडवर पार्किंग निर्बंध लागू

पुढील बातमी
इतर बातम्या