बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबई अग्निशमन दलाच्या (MFB) अंतर्गत पुढील तीन वर्षांसाठी लाईफगार्ड सेवा सांभाळण्यासाठी खाजगी यंत्रणा नेमण्यासाठी निविदा काढली आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर 93 वरून लाईफगार्डची संख्या वाढवून 137 करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मुंबई तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेली आहे. शहराला 149 किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. गर्दीचे प्रमाण, समुद्रातील प्रवाह आणि किनारी भौगोलिक स्थिती यांचा अभ्यास केला. त्यानंतर MFB ने सहा समुद्रकिनाऱ्यांना बुडण्याच्या घटनांसाठी उच्च-जोखमीचे क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
यामध्ये शहरातील गिरगाव आणि दादर, तसेच उपनगरातील जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई या समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी या ठिकाणी लाखो पर्यटक येतात, विशेषतः पावसाळ्यात जेव्हा उंच लाटांचे आकर्षण लोकांना धोकादायकरीत्या समुद्राच्या जवळ खेचते.
आत्तापर्यंत BMC ने खाजगी संस्थेमार्फत 93 लाईफगार्डची नेमणूक करून वर्षभर किनारपट्टीवर गस्त ठेवली आहे. त्याचबरोबर 11 मनपाचे कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीसाठी सतत तयार ठेवले जातात.
एका वरिष्ठ अग्निशमन अधिकाऱ्यांनी नमूद केले की, अनेक तरुण चेतावणी फलकांकडे दुर्लक्ष करून खवळलेल्या समुद्रात उतरतात. यामुळे धोका वाढतो. लाईफगार्डची संख्या अपुरी असल्याचेही सांगण्यात आले. जर संख्या वाढवली तर सध्याच्या कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल अशी अपेक्षा आहे.
2025 ते 2028 या कालावधीसाठी होणाऱ्या नव्या करारात संस्थेला 137 प्रशिक्षित लाईफगार्ड उपलब्ध करून द्यावे लागतील. हे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील. ज्यामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर चौवीस तास सतर्कता राहील. त्यांना मदत करण्यासाठी सात जेट स्की, फ्लोटिंग स्ट्रेचर्स, लाईफबॉयज, बचाव नौका, ट्यूब्स आणि दोरखंड यांसारखे अतिरिक्त उपकरणेही तैनात करण्यात येतील.
यासोबतच BMC आपली बचाव क्षमता आधुनिक करण्यासाठी पावले उचलत आहे. सहा रोबोटिक लाईफ-सेव्हिंग बुईज खरेदी करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. हे उपकरणे बुडण्याच्या घटनांमध्ये जलद आणि सुरक्षित बचावासाठी उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षा आहे.
तरीदेखील, अधिकाऱ्यांनी मान्य केले की, आदर्श कव्हरेज मिळवणे अजूनही आव्हानात्मक आहे. सुरक्षिततेच्या निकषांनुसार प्रत्येक 100 मीटरवर एक लाईफगार्ड हवा.
पर्यटकांची संख्या दरवर्षी, विशेषतः पावसाळ्यात वाढत आहेत. यामुळे हे उपाय बुडण्याचा धोका कमी करण्यासाठी आणि संकटात सापडलेल्या लोकांना वेळेत मदत करण्यासाठी अत्यावश्यक ठरत आहेत.