2028 अखेरपर्यंत नारिमन पॉइंट-भाईंदर सिग्नलमुक्त मार्ग पूर्ण होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (WEH) ताण घटवण्यासाठी प्रस्तावित नारिमन पॉइंट ते भाईंदर सिग्नलमुक्त मार्ग 2028 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

रविवारी सुरू असलेल्या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते. मुंबईतील सुमारे ६० टक्के वाहतूक पश्चिम द्रुतगती महामार्गावर अवलंबून असल्याने पर्यायी जलद मार्ग उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

"नारिमन पॉइंट ते भाईंदर असा सिग्नलमुक्त मार्ग तयार केला जात आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. मुंबईतील सुमारे 60 टक्के वाहतूक पश्चिम द्रुतगती महामार्गावरून होते. हा प्रकल्प त्या मार्गावरील ताण कमी करण्यास मदत करेल," असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग

हा प्रकल्प मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग असून, शहरासाठी अखंड उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर निर्माण करणार आहे. नारिमन पॉइंट ते वांद्रे वरळी सी लिंक (Bandra-Worli Sea Link) हा दक्षिणेकडील टप्पा मार्च 2024 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता उत्तरेकडील टप्प्यात वर्सोवा ते भाईंदर जोडले जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ऑक्टोबर-नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2028 पर्यंत संपूर्ण कॉरिडॉर पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल, महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि दक्षिण मुंबई व उपनगरांमधील संपर्क अधिक सुलभ होईल.

कोस्टल रोड परिसरात उभारणार नवे व्यावसायिक केंद्र

देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडलगतच्या परिसराचा विकास Bandra Kurla Complex (बीकेसी) धर्तीवर आधुनिक व्यावसायिक केंद्र म्हणून करण्याची योजनाही जाहीर केली. यामुळे व्यवसाय, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरणीय मंजुरी आणि जमीन संपादन पूर्ण

प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आवश्यक सर्व पर्यावरणीय मंजुरी मिळाल्या असून जमीन संपादनाची प्रक्रिया गेल्या वर्षी पूर्ण झाली आहे. मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची उभारणीही सुरू झाली आहे. पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी भरपाई म्हणून खारफुटी (मॅन्ग्रोव्ह) लागवड करण्यात येणार आहे.

सहा पॅकेजमध्ये होणार काम

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सहा पॅकेजमध्ये विभागण्यात आले आहे:

  • पॅकेज A: वर्सोवा ते बंगूर नगर (गोरेगाव) – 4.5 किमी

  • पॅकेज B: बंगूर नगर ते माईंडस्पेस (मालाड) – 1.66 किमी

  • पॅकेज C आणि D: माईंडस्पेस ते चारकोप (कांदिवली) दरम्यान प्रत्येकी 3.9 किमी लांबीचे जुळे बोगदे

  • पॅकेज E: चारकोप ते गोराई – 3.78 किमी

  • पॅकेज F: गोराई ते दहिसर – 3.69 किमी

याशिवाय दहिसर ते भाईंदर जोडण्यासाठी स्वतंत्र 5.6 किमी लांबीचा उन्नत (एलिव्हेटेड) कॉरिडॉर उभारला जात आहे.

२५ हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

संपूर्ण कोस्टल कॉरिडॉरची लांबी सुमारे 25 किलोमीटर असणार असून, त्यासाठी अंदाजे 25 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणेल आणि लाखो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक जलद व सुलभ करेल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.


हेही वाचा

बदलापूरमधील सिग्नल यंत्रणेत मराठीचा वापर

कोकण रेल्वेचं दुपदरीकरण होणार

पुढील बातमी
इतर बातम्या