मुंबई वाहतूक पोलिसांनी गोरेगाव ट्रॅफिक विभागातील एका महत्त्वाच्या रस्त्यावर ‘नो पार्किंग झोन’ जाहीर केला आहे. मुंबईत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
महात्मा गांधी रोडवरील रत्ना हॉटेल जंक्शन (स्वामी विवेकानंद रोड) ते बांगूर नगर येथील जय तारामती को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीपर्यंतच्या दोन्ही बाजूंना आता कोणत्याही प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीच्या सुरळीत प्रवाहात अडथळे निर्माण होत होते. तसेच दीर्घकाळ वाहनं उभी ठेवल्यामुळे सुरक्षेच्या आणि कायदा-सुव्यवस्थेच्या तक्रारीही वाढत होत्या.
या पार्श्वभूमीवर संबंधित रस्ता अधिकृतपणे ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला असून हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा आदेश अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) डॉ. प्रियांका नारनवरे यांनी जारी केला आहे.
दरम्यान, विक्रोळी परिसरातही तात्पुरते वाहतूक बदल जाहीर करण्यात आले आहेत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील प्रवीण हॉटेलजवळ पादचारी पूल उभारण्याच्या कामासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
18 एप्रिल रोजी रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत काही मार्ग तात्पुरते बंद ठेवून पर्यायी मार्गांचा वापर करण्यात येणार आहे.
मुंबईकडे (दक्षिणेकडे) जाणारी वाहतूक JVLR जंक्शनवरून उजवीकडे वळवून बिंदू माधव जंक्शनमार्गे गांधीनगर ब्रिज स्लिप रोड आणि पुढे एलबीएस मार्गाने सोडण्यात येईल.
तर ठाणे/पवईकडे (उत्तर दिशेला) जाणारी वाहतूक नारायण बोधे जंक्शनवरून डावीकडे वळवून विक्रोळी ईस्ट-वेस्ट ब्रिजमार्गे एलबीएस मार्गाने पुढे वळवण्यात येईल.
वाहनचालकांनी या बदलांची नोंद घेऊन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा आदेश पूर्व उपनगर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी जारी केला आहे.
हेही वाचा