शुक्रवारीही मुंबईतील लसीकरण केंद्रे बंदच राहणार!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा जाणवत असल्याने मुंबई महापालिकेने १२-१३ आॅगस्ट रोजी शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरूवार प्रमाणेच शुक्रवारी देखील लसीकरण केंद्रे बंदच राहणार आहेत. 

राज्यासोबतच प्रामुख्याने मुंबईत लसीचा मोठा तुटवडा अधिक जाणवत आहे. गेल्या १५ दिवसांत मुंबईत ३ वेळा लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. लोकल प्रवासासाठी लसीकरण आवश्यक असल्याने मुंबईकर लस मिळवण्यासाठी धडपडत असताना लसीकरण बंद असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

हेही वाचा- आॅगस्ट १ ते १० तारखेदरम्यान राज्यात लसीचा ३० टक्के तुटवडा!

 

लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने लसीकरणाची अट घातली आहे. ज्या लोकांना लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेत, त्यांना लोकल ट्रेनचे पास दिले जात आहेत. त्यामुळे आता मुंबईकर लोकल प्रवास करता यावा म्हणून लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. लोकल प्रवास सुरू व्हावा यासाठी कर्मचारी रात्रभर रांगा लावून लस घेण्यासाठी धडपड करत असताना दुसरीकडे लस तुटवड्यामुळं लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत.

कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी आणि तिसरी लाट थोपवून धरण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व मुंबईकरांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. मात्र अपुरा लससाठ्यामुळे दिवसाला १ लाख लशींचं उद्दिष्ट गाठणंही महापालिकेला अवघड होत आहे.

राज्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास जुलैच्या तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लसीकरणात ३० टक्के घट दिसून आली आहे. लसीच्या तुटवड्यामुळं लसीकरणात अडथळे निर्माण होत आहेत. जुलैच्या पहिल्या आणि शेवटच्या दहा दिवसांत महाराष्ट्राला लसीचे ४० लाख डोस मिळाले होते. त्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात आतापर्यंत २८ लाख डोसपेक्षा कमी डोस महाराष्ट्राला मिळाले आहेत.  

हेही वाचा- नवीन ऑक्सिजन प्लांट १७ ऑगस्टपासून होणार कार्यान्वित

पुढील बातमी
इतर बातम्या