अखेर शिवाजी पार्कचं नामांतर, आता म्हणा…

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, राजकीय सभा-संमेलन आयोजनाचं प्रमुख ठिकाण असलेल्या दादरमधील शिवाजी पार्कचं नाव अखेर बदल्यात आहे. यापुढे शिवाजी पार्क आता 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' या नावाने ओळखलं जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून या नामबदलाची अधिकृत पाटी मैदानात लावण्यात आली आहे.

‘शिवाजी पार्क’ या नावामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याने मैदानाचं नाव बदलण्यात यावं, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. विशेषकरून शिवसेना या नामबदलासाठी प्रयत्नशील होती. याबाबतच्या नामांतराचा प्रस्ताव मार्च महिन्यात महापालिका सभागृहात मांडण्यात आला होता. हा ठराव मंजूर झाल्याने या मैदानावर नव्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. 

हेही वाचा- शिवाजी पार्क परिसरात सापांचा सुळसुळाट

१०० वर्षांहून अधिक जुना इतिहास असलेल्या या मैदानाचं आधीचं नाव माहीम पार्क असं होतं. त्यानंतर १० मे १९२७ रोजी शिवाजी पार्क असं नाव देण्याचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल ७३ वर्षांनी शिवाजी पार्क मैदानाचं नाव बदलण्यात आलं आहे. 

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांसारख्या दिग्गज क्रीडापटूंची बहरलेली कारकीर्द असो किंवा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतिर्थाला दिलेला सन्मान असो वेगवेगळ्या कारणांनी हे मैदान नेहमीच चर्चेत राहीलं आहे.

तर मागील काही दिवसांपासून शिवाजी पार्कमध्ये साप सापडण्याच्या घटनेमुळेही शिवाजी पार्क चर्चेत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या