नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या संयुक्त पुढाकारातून हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. नेरुळमधील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी ऑफ एक्सलन्स येथे ‘Drug-Free Navi Mumbai Mission’ अंतर्गत पोलिसांच्या ‘Campus Connect’ मोहिमेची सुरुवातही यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, ड्रग्जविरोधातील लढा केवळ अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यापुरता मर्यादित नसावा, तर मागणी कमी करण्यासाठीही जनजागृती आणि शिक्षण आवश्यक आहे. नवी मुंबईतील प्रत्येक शैक्षणिक संस्था ड्रग्जविरोधी लढ्याचं केंद्र बनली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असं त्यांनी आवाहन केलं.
व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांकडे केवळ गुन्हेगार म्हणून पाहू नये, तर त्यांना उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी मिळाली पाहिजे, यावरही फडणवीस यांनी भर दिला.
CBD बेलापूरच्या सेक्टर 8 मधील मदर तेरेसा बिल्डिंगमध्ये हे व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र उभारण्यात आलं आहे. सुरुवातीला या केंद्रात 11 बेडची क्षमता असेल.
व्यसनातून बाहेर पडलेल्या व्यक्तींना पुन्हा सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात आणण्यासाठी येथे समुपदेशन, लाइफ-स्किल्स प्रशिक्षण, कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि मनोरंजनात्मक उपक्रम राबवले जाणार आहेत.
हे केंद्र Bandhki Foundation मार्फत चालवलं जाणार आहे.
रुग्णांच्या पुनर्वसन प्रक्रियेत त्यांच्या कुटुंबीयांचाही सहभाग महत्त्वाचा मानला जाणार असून, कुटुंबीयांचं समुपदेशन आणि नियमित संवाद साधला जाणार आहे.
केंद्रात मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, नर्सेस आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध असतील. डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांवर उपचार केले जातील.
व्यसनामुळे निर्माण होणारी चिंता, भीती, नैराश्य आणि मानसिक तणाव यावरही मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केले जाणार आहेत.
याशिवाय योग, ध्यान, व्यायाम तसेच कॅरम आणि बुद्धिबळासारख्या उपक्रमांद्वारे रुग्णांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.
दारू, ड्रग्ज आणि इतर घातक पदार्थांचं व्यसन केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही, तर मानसिक आरोग्य, शिक्षण, करिअर आणि कौटुंबिक जीवनावरही परिणाम करतं, असं फडणवीस यांनी सांगितलं.
त्यामुळे ‘Campus Connect’ मोहिमेतून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाणार असून, व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्यांसाठी हे पुनर्वसन केंद्र उपचार आणि आधार देणार आहे.
हेही वाचा