मीरा–भाईंदर परिसरातील अलीकडेच बांधण्यात आलेल्या एका उड्डाणपुलाने सोशल मीडियावर विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या उड्डाणपुलाच्या डिझाइनचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने हा उड्डाणपूल उभारण्यात आला. तरी त्याची वेगळी रचना पाहून नियोजन आणि अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
“Gems of Mira Bhayandar” (@GemsOfMBMC) या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये या प्रकल्पाच्या डिझाइनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
जेम्स ऑफ मीरा-भाईंदर या X हँडलवर या ब्रीजचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला ब्रीज हा चार पदरी ब्रीज आहे. मात्र पुढे जाऊन हा चारपदरी ब्रीज फक्त दोन पदरांचा करण्यात आला आहे.
मंगळवार, 27 जानेवारी रोजी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. मेट्रो लाईन 9 प्रकल्पाचा भाग असलेला हा डबल डेकर उड्डाणपूल फेब्रुवारीमध्ये सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच असा डिझाइन कसा मंजूर झाला, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
MMRDA ने स्पष्ट केले की उड्डाणपूल अचानक अरुंद होत नाही. चार लेनवरून दोन लेनवर येण्यामागे रस्त्याची मर्यादित रुंदी आणि भविष्यातील वाहतूक जाळ्याचे नियोजन हे कारण आहे. त्यांच्या मते, ही डिझाइनची चूक नाही.
प्राधिकरणाने सांगितले की, सध्या उड्डाणपुलावर दोन लेन या भाईंदर पूर्वेसाठी वापरात आहेत. उर्वरित दोन लेन भविष्यात भाईंदर पश्चिमेला जोडण्यासाठी नियोजित आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरून होणाऱ्या विस्तार प्रकल्पाचा भाग म्हणून या लेन विकसित केल्या जाणार आहेत.
MMRDA ने पुढे स्पष्ट केले की सध्याच्या अलाइनमेंटनुसार आधी भाईंदर पूर्वेकडील मार्ग येतो. त्यामुळे सध्या फक्त दोन लेन वापरात आहेत. बाहेरील दोन लेन भविष्यातील भाईंदर पश्चिमेकडील विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
साधारणपणे उड्डाणपूल वाहतूक सुरळीत आणि जलद करण्यासाठी बांधले जातात. मात्र या प्रकरणात लेन कमी झाल्यामुळे अडथळा निर्माण होतो आहे. चार लेनवर वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक दोन लेनमध्ये एकत्र यावे लागत असल्याने वाहतूक कोंडी आणि रस्ते सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
या डिझाइनवरून सोशल मीडियावर उपरोधिक टीकाही होत आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्ते आणि स्थानिक रहिवासी यावर टीकात्मक प्रतिक्रिया देत आहेत. काही पोस्टमध्ये या रचनेची खिल्ली उडवण्यात आली असून अभियांत्रिकी पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
या डिझाइनमागील कारणांबाबत तर्कवितर्कही सुरू आहेत. काहींच्या मते, जमिनीची उपलब्धता आणि सुरू असलेल्या मेट्रो बांधकामामुळे हा आराखडा ठरला असावा. भविष्यातील रुंदीकरण आणि जोडरस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक समस्यांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा