शताब्दी रुग्णालयाला भूलतज्ज्ञच मिळेनात?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कांदिवली पश्चिमेकडील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालयात (शताब्दी रुग्णालय) मागील अनेक दिवसांपासून 'भूलतज्ज्ञ' (अॅनेस्थेटिस्ट) नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. रुग्णालयात 'भूलतज्ज्ञ'च नसतील, तर त्यांच्याशिवाय कुठल्याही रुग्णांची शस्त्रक्रिया होऊच शकत नाही. मेट्रो-3 च्या बॅरिकेड्सने मंगळवारी स्कूटरचालक हितेश पिठाडिया गंभीर जखमी झाले होते. त्यांना शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्यावर तेथे शस्त्रक्रियेसाठी 'भूलतज्ज्ञ'च नसल्याचा प्रकार समोर आला होता.

बोरीवलीच्या काजूपाडा येथे राहणारे हितेश पिठाडिया मंगळवारी कामानिमित्त द्रुतगती महामार्गाने दहिसरच्या दिशेने जात होते. ते अशोक वन परिसरातून जात असताना अचानक रस्त्यावर उभे केलेले मेट्रोचे 3 बॅरिकेड्स त्यांच्या स्कूटरवर पडले आणि त्यांचा डावा पाय त्या बॅरिकेड्सखाली आला. वाहतूक पोलिसांनी त्यांना आधी जवळच्या करुणा रुग्णालयात दाखल केले. पण, त्यानंतर त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. हितेश यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर लगेचच शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. पण, शताब्दी रुग्णालयात 'भूलतज्ज्ञ'च नसल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया कशी करायची? असा प्रश्न तेथील डॉक्टरांना पडला. त्यामुळे त्यांना ऐनवेळी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या नायर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रुग्णालयात 'भूलतज्ज्ञा'ची कमतरता आहे. कारण काही 'भूलतज्ज्ञ' सुट्टीवर गेले आहेत आणि काही रुग्णालय सोडून गेले आहेत. माझे वरिष्ठ काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत. काल त्या व्यक्तीला परत का जावे लागले हे मला कळालेले नाही. तरी या प्रकरणाबद्दल मी आमच्या वरिष्ठांशी बोलेन आणि पुढील माहिती देईन.
- डॉ. प्रदीप आंग्रे, उपवैद्यकीय अधिक्षक, शताब्दी रुग्णालय

पुढील बातमी
इतर बातम्या