16 सप्टेंबरपासून जकात कर होणार बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेला जकात कर 16 सप्टेंबर पासून बंद होणार आहे. देशातील सर्व शहरांमध्ये उशिरात उशिरा म्हणजे 16 सप्टेंबर 2017 पर्यंत वस्तू आणि सेवा कर लागू होईल. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर जकात संपुष्टात येईल, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या वतीने वसूल करण्यात येणाऱ्या जकातीपासून चालू आर्थिक वर्षात 7 हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु फेब्रुवारी 2017 पर्यत 6 हजार 546 कोटी रुपये वसूल झाले आहेत. मात्र 16 सप्टेंबरपासून जकात बंद होणार असल्यामुळे पुढील आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांसाठी जकातीपासूनचे उत्पन्न, तर उर्वरीत 9 महिन्यांसाठी वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर मिळणारी भरपाई अंदाजित केली आहे. त्यानुसार जकातीपासूनचे एकूण 1500 कोटी रुपये तर वस्तू आणि सेवा करापोटी 5883.75 कोटी इतके उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर नुकसान भरपाई ही जास्तीत जास्त 5 वर्षांच्या कालावधीपर्यंत राहील, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले.

नजीकच्या काळात जकात कर रद्द होणार असल्यामुळे जकात नाक्यांवरील भांडवली खर्चात कपात करण्यात आली आहे. जकात रद्द होणार असल्यामुळे तसेच पुढील पाच वर्ष नुकसान भरपाईपोटी महापालिकेला आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे पुढील पाच वर्षात पर्यायी करांचा शोध महापालिकेच्या वतीने तसेच सरकारच्या वतीने घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

व्यवसायकर वसूल करण्याचा पर्याय

जकात कर रद्द होणार असल्यामुळे पर्यायी महसुलाच्या स्त्रोतांचा विचार करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य शासन वसूल करत असलेला व्यवसाय कर वसूल करण्याचा अधिकार महापालिकेला मिळावा, अशी विनंती राज्य शासनाला केली असल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नमूद केले.

तसेच स्थावर मालमत्तेच्या विक्री किंवा बक्षीसपत्राबाबत आणि गहाण खतात समाविष्ट असणाऱ्या किंमतीवर एक टक्का अधिभार लागू करण्याकरता मुंबई मुद्रांक शुल्क कायदा 1958 आणि बृहन्मुंबई महापालिका अधिनियम 1888 मध्ये सुधारणा करण्यासाठी देखील राज्य शासनाला विनंती केली आहे. यामध्ये सुधारणा मंजूर झाल्यास त्यामधून 3 हजार कोटी एवढा अतिरिक्त महसूल प्राप्त होईल, असे मेहता यांनी स्पष्ट केले.

पुढील बातमी
इतर बातम्या