परवान्याशिवाय पाळीव प्राणी,पक्षी विकण्यास बंदी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - क्रॉफर्ड मार्केटमधील पाळीव प्राणी, पक्षी आणि मासे विक्रीची दुकाने ही मुंबईकरांची प्रमुख आकर्षण केंद्रं. क्रॉफर्ड मार्केटमध्ये फळे तसेच अन्य वस्तूंची खरेदी करायला गेल्यानंतर पक्षी आणि प्राण्यांच्या दुकानांकडे फेरफटका मारल्याशिवाय आपल्याला राहवत नाही. परंतु आता या पाळीव प्राणी आणि पक्षी विक्रेत्यांकडे परवाना नसेल तर यांची विक्री करता येणार नाही. अशा प्राणी आणि पक्षांच्या विक्रीसाठी महापालिकेच्या वतीने कायद्यात सुधारणा करून नव्याने परवाना दिला जाणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले मंडईतील अर्थात क्रॉफर्ड मार्केटमधील पक्षी विभागातील गाळ्यांवर पाळीव प्राणी, पाळीव पक्षी, मासे यांची विक्री करण्यास परवानगी लागणार आहे. क्रॉफर्ड मार्केटमध्ये सध्या एकूण ११०० परवानाधारकांंना महापालिकेच्या वतीने परवाने देण्यात आले आहेत. या मंडईत भाजी आणि फळे, प्राणी, मटण, बीफ आणि पक्षी असे विभाग आहेत. पक्षी विभागात एकूण १८ दुकाने असून, त्यांना फार पूर्वीपासून पक्षी विकणे असा व्यवसाय परवाना देण्यात आला आहे. पक्षी हा नोंदणीकृत व्यवसाय असला तरी त्यांना आता नव्याने परवाना घेणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या मंड्यांमध्ये व्यवसायासाठी देण्यात येणाऱ्या ‘जज’ अनुसूचीमधील विक्रेय वस्तूंच्या यादीत कुत्रा, मांजर, ससा, उंदीर हे पाळीव प्राणी आणि कासव, शोभिवंत मासे आणि शोभिवंत पक्षी त्यासाठी लागणारे पिंजरे’ अशा विक्रेय वस्तू अंतर्भूत करण्यात येणार आहेत.

महापालिका अधिनियम १८८८ मधील कलम ३९८ (२)नुसार महापालिकेची मंजुरी प्राप्त करून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका मंड्यांमध्ये या व्यवसायाकरता आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेणे बंधनकारक राहील. तसेच अशाप्रकारे परवान्याशिवाय पाळीव प्राणी आणि पक्ष्यांची कोणत्याही कायद्यांतर्गत विक्री करता येणार नाही, असे महापालिका बाजार विभागाने स्पष्ट केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या