स्वच्छतागृहाअभावी राणीबागेत पर्यटकांची कुचंबणा

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात (राणीबाग) हॅम्बोल्ट पेंग्विन कक्ष हे मुंबईकरांचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. सरासरी २५ हजार पर्यटक राणीबागेत भेट देण्यासाठी येत असतात. परंतु हजारो पर्यटक येत असलेल्या या राणीबागेत प्रसाधनगृहांचीच कमतरता आहे. राणीगेतील या प्रशस्त ठिकाणी केवळ दोनच प्रसाधनगृहे आहेत. पर्यायी मोबाईल टॉयलेटचीही सुविधा उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे पर्यटकांची कुचंबणा होत आहे.

राणीबागेत पक्षी आणि प्राण्यांची संख्या कमी झाल्यामुळे रिकामे पिंजरे पाहावे लागत असल्यामुळे मुंबईकरांनी राणीबागेकडे पाठ फिरवली होती. परंतु राणीबागेत आलेल्या पाहुण्या पेंग्विन पक्ष्यांचे दर्शन मागील महिन्यांपासून लोकांना खुले केल्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. पेंग्विनला पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढत असून मागील शनिवारी एकाच दिवशी ४० हजारांच्यावर पर्यटकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे आता पेंग्विन्स पाहण्यासाठी नागरिकांची उडणारी झुंबड लक्षात घेता महापालिका प्रशासनानेही यापुढे २५ हजार पर्यटकांनाच पेंग्विन्स पाहण्यासाठी प्रवेश दिला जाईल, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राणीबागेत सरासरी २५ हजार पर्यटक येत असतानाच याठिकाणी स्वच्छतागृहांची संख्या अपुरी असल्याने येथे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होताना दिसत आहे. 

राणीबागेत प्रवेश केल्यानंतर हत्तीच्या पिंजऱ्याजवळ एक स्वच्छतागृह आहे. तर दुसरे स्वच्छतागृह हे उद्यान अधिक्षक कार्यालयाशेजारी आहे. परंतु हे स्वच्छतागृह नुतनीकरणाच्या नावाखाली बंद आहे. याठिकाणच्या स्वच्छतागृहाचे नुतनीकरण करून यामधील सुविधा वाढवण्यात येत असल्या तरी सध्या तुर्तास तरी राणीबागेत अन्यठिकाणी प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही. पक्ष्यांच्या पिंजऱ्याजवळ एकमेव मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिली तरीही नागरिकांसाठी पुरेसे नसल्यामुळे स्वच्छतागृहाचे नुतनीकरण होईपर्यंत मोबाईल टॉयलेटची संख्या वाढवली जावी, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.

राणीबागेचे प्रभारी संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राणीबागेत प्रसाधनगृहाची संख्या कमी असल्याचे मान्य केले. पर्यटकांची संख्या वाढत मोबाईल टॉयलेटची मागणी उपायुक्त सुधीर नाईक यांनी घनकचरा विभागाकडे केली आहे. त्यामुळे मोबाईल टॉयलेट उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्यान अधिक्षक कार्यालयाजवळील नुतनीकरण करण्यात येत असलेले प्रसाधनगृह हे येत्या १५ दिवसांमध्ये काम पूर्ण झाल्यावर ते लोकांसाठी खुले केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या