सलग पाचव्या दिवशीही परिचारिकांचा संप कायम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमधील परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांची सरकारने अद्याप दखल न घेतल्याने, या परिचारिकांनी सोमवारी, पाचव्या दिवशीही संप सुरूच ठेवला.

मुंबईत (mumbai) आझाद मैदानात आंदोलन करून परिचारिकांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान करून ‘रुग्णांची काळजी आहे, मात्र सरकारने आमच्या प्रश्नांकडे लक्ष न दिल्याच्या भूमिकेचा’ निषेध त्यांनी व्यक्त केला.

राज्यात (maharashtra) परिचारिकांनी (nurse) 146 युनिट रक्तसंकलन केल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे सुरू झालेल्या या बेमुदत संप आंदोलनाला राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

या संपामुळे राज्यभरातील अनेक सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांतील आरोग्यसेवा बाधित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय सेवेअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. सरकारने या मागण्यांकडे संवेदनशीलतेने लक्ष देणे अत्यावश्यक आहे, याकडे संघटनेने लक्ष वेधले.

प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव यांनाही मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

परिचारिकांच्या समस्या आणि त्यामागील वेदना सरकारने समजून घ्यावी, तसेच संवाद, समज आणि समाधानाच्या मार्गाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा असंतोषाची लाट संपूर्ण आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभी करू शकते, असा इशारा महासंघाने दिला आहे.


हेही वाचा

लोकल रेल्वेमध्ये सुऱक्षा वाढवण्यात येणार

डोंबिवलीच्या तरूणाचा आफ्रिकेत कौतुकास्पद विक्रम

पुढील बातमी
इतर बातम्या