ओला, उबर चालकांचे 'जेलभरो आंदोलन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मंगळवारी भाडेवाढीच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मोठ्या संख्येने निदर्शने करणाऱ्या चालकांच्या शिष्टमंडळाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांनी भेट न दिल्याने ओला उबर चालक (drivers) संघटनेने त्यांचा संताप व्यक्त केला आहे.

मंत्र्यांशी भेटीची वेळ मागणाऱ्या परंतु त्यांना यश न आल्याने निदर्शकांनी सरनाईक यांच्यावर आरोप केले. ओला (OLA), उबर (Uber) आणि रॅपिडो (rapido) सरकारपेक्षा "अधिक शक्तिशाली" आहेत का असा प्रश्न विचारणारे पोस्टर्सही त्यांनी लावले.

चालकांनी 'जेल भरो' आंदोलनाची घोषणा केली आणि गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आगामी महायुतीच्या विरोधात मतदान करणार असल्याचे सांगितले.

चालक संघटनेने परिवहन मंत्रालय/विभागावर केलेल्या या आरोपांनंतर, अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी युनियनला नोटीस पाठवली आणि वाहतूक विभागाची 'बदनामी' करणे थांबवण्याचा इशारा दिला.

आंदोलकांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती, परंतु ती न मिळाल्याने आंदोलन अधिक आक्रमक झाले. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत मंगळवारी रात्रीपासून ‘ जेलभरो ’ आंदोलन करण्याचा निर्णय टॅक्सी चालकांनी घेतला.

सरकारने ॲपआधारित टॅक्सी चालकांसाठी दर निश्चित करावेत, ते दर लागू न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, गुन्हा नोंदवलेल्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याऐवजी त्यांचे बाइक टॅक्सीचे परवाने रद्द करावेत, अशा मागण्यांसाठी शहर व उपनगरांतील चालकांचे आंदोलन सुरू आहे.

‘सरकारने केवळ ई-बाइक टॅक्सीला मुभा दिली आहे. त्यानुसार प्रोव्हिजनल लायसन्स देण्यात आले. रस्त्यांवर पेट्रोल बाइक टॅक्सींवर प्रवासी वाहतूक सुरू आहे. यामुळे कंपन्यांकडून सरकारच्या अटी-शर्तींचा भंग झाला आहे.

यात कंपन्यांनी परिवहन विभागाने निश्चित केलेले भाडेदर अॅपमध्ये दाखवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारण्यात येत आहे’, असा आरोप भारतीय गिग कामगार मंचाचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी केला.

दरम्यान, ‘मुंबई महानगर प्रदेशात बेकायदा बाइक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकांकडून दंडदेखील वसूल करण्यात आला आहे.

अॅपआधारित रिक्षा-टॅक्सी कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, असे पत्र मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी क्षीरसागर यांना पाठवले आहे.

‘आंदोलकांकडून वाहनांवर तसेच आझाद मैदान येथे फलक उभारून परिवहन विभागाची बदनामी करण्यात येत आहे. ती कायम राहिल्यास आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र कामगार सभा संघटनेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

अ‍ॅग्रीगेटर कॅबसाठी एसी काली पीली टॅक्सी भाडे लागू करण्यासाठी वाहतूक विभागाने अ‍ॅग्रीगेटरना दिलेले निर्देश अ‍ॅपमध्ये अपडेट करावेत अशी मागणीही संघटनेने केली.


हेही वाचा

कॅन्सर रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार सरकारी रुग्णालयांत मिळणार

एसटीचे तिकीट 10% महागले

पुढील बातमी
इतर बातम्या