मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रेल्वेनं विनातिकीट प्रवास केल्यास संबंधित प्रवाशांवर कारवाई केली जाते. त्यामुळं, रेल्वे प्रशासनानं वारंवार सूचना देत विनातिकीट प्रवास न करण्याचं आवाहन केलं. मात्र, तरीही अनेक प्रवासी प्रवास करत असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून विनातिकीट आणि बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या १ लाख ५८ हजार जणांवर कारवाई करून रेल्वेने त्यांच्याकडून ४ कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल केला. 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने १५ जून २०२० ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान ही कारवाई केली. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. इतरांना खासगी वाहने किंवा बसचा वापर करावा लागत असे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा कित्येक तासांचा वेळ आणि पैसे खर्ची पडत होते. त्या काळात अनेकांनी विनातिकीट अथवा बनावट ओळखपत्रांच्या आधारे लोकल प्रवास केला.

बनावट ओळखपत्र, बदललेले तिकीट आणि तिकिटांच्या रंगीत झेरॉक्स काढून त्यावर प्रवास करणे, त्याचबरोबर प्रणालीतून मिळालेल्या तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतरण करणे आणि ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग आदी मार्गांनी बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कडक मोहीम उघडली.

तपासणी दरम्यान उपनगरीय लोकल गाड्यांतून अवैध प्रवास करणारे १ लाख २१ हजार प्रवासी सापडले. त्यांच्याकडून रेल्वेने २ कोटी ८७ लाख रुपयांचा दंड वसूल केला. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ३७ हजार ८२३ प्रवासी सापडले. त्यांच्याकडून रेल्वेनं २ कोटी ९ लाख रुपयांचा दंड आकारला.

पुढील बातमी
इतर बातम्या