Barge P305 : ONGC कडून मृत्युमुखी आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक मदत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

तौंतेच्या तडाख्यात बुडालेल्या बार्ज पी ३०५ वरून आतापर्यंत १८६ जणांना वाचवण्यात यश आलंय. तर ५१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. अजून २७ कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय. या दुर्घटनेनंतर बार्जच्या चीफ इंजीनिअरनं दिलेल्या तक्रारीनंतर कॅप्टन आणि अन्य लोकांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

या घटनेनंतर ONGC (Oil and Natural Gas Corporation) कडून चक्रीवादळाच्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्या, बेपत्ता असलेल्या आणि वाचलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आलीय.

मेसर्स अफकॉन्स बाधित कर्मचाऱ्यांना भरपाई देण्याबाबत काम करत आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ONGC व्यवस्थापनाने बचावलेल्याना १ लाख रुपयांची आणि मृत्युमुखी पडलेल्या आणि बेपत्ता असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना २ लाख रुपयांची त्वरित मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

ONGCनं मदत पुरवण्यासाठी एक मदतकक्ष देखील स्थापन केला आहे. ONGC बचाव कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना रसद आणि खर्च पुरवेल. हेल्पलाईन क्रमांक पुढील प्रमाणेः 022-26274419, 022-26274420 आणि 022-26274421. तसंच संकेतस्थळ www.ongcindia.com वर प्रभावित कर्मचाऱ्यांची यादी उपलब्ध केली जात आहे.

अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टी भागात ONGCच्या प्रकल्पावर काम करणार्‍या मेसर्स अफकॉन्सच्या तीन बांधकाम बार्जेस आणि ONGCच्या एका फ्लोटर ड्रिलिंग रिगला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. बार्ज पी-305 गटांगळ्या खाऊ लागले आणि ते ओएनजीसीच्या मानवरहित प्लॅटफॉर्मवर आदळले.

बार्ज आदळल्यानंतर त्यात पाणी शिरले आणि अखेर १७ मे, २०२१ रोजी संध्याकाळी ५च्या सुमारास ते उलटले. INS कोची आणि INS कोलकाता यांच्यासह भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांसह ओएनजीसीच्या किनाऱ्यावरील मदत नौका बचाव कार्यासाठी ताबडतोब सेवेत तैनात करण्यात आलेत. तटरक्षक दल आणि ONGCसह भारतीय नौदलाचे व्यापक शोध आणि बचावकार्य सुरू आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या