बोईसर रेल्वे स्टेशनजवळ अंडरपास बांधकामासाठी प्रस्ताव

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वे स्टेशनजवळ उड्डाणपूल आणि अंडरपासच्या बांधकामासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच अंडरपाससाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

बोईसर येथील रेल्वे समपार फाटक बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपूल आणि अंडरपास उभारण्याबाबत वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली.

यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तारे, पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुमती जाखड, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे महाव्यवस्थापक विकास कुमार तसेच रेल्वे विकास निगम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांनी बोईसर रेल्वे स्टेशनजवळील समपार फाटक बंद करून अंडरपास तसेच रेल्वे उड्डाणपूल (ROB) उभारण्याची मागणी केली होती.

उड्डाणपूलाच्या डिझाइनिंगच्या वेळी काही आदिवासी गावांचे विस्थापन होत असल्याने स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे वनमंत्री आणि पालकमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांच्या सोयीचा विचार करून उड्डाणपूलाचे सुधारित आराखडे (डिझाइन) तयार करण्याचे निर्देश दिले.

या ठिकाणी अंडरपास उभारण्यासाठी सुमारे 125 कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यापैकी राज्य सरकारकडून 62.50 कोटी रुपयांची गरज आहे.

यावर वनमंत्री नाईक यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून अंडरपाससाठी निधीची मागणी केली. मंत्री भोसले यांनी ही मागणी तत्त्वतः मान्य केली असून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या