मुंबईच्या (mumbai) रस्त्यांवरून पालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची दुरवस्था झाली आहे. जुन्या वाहनांमुळे (old vehicles) अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हा धोका लक्षात घेता जुनी वाहनांना रस्त्यावर आणूच नये, असे सक्त आदेश पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिले आहेत.
धारावी (dharavi) परिसरातील घनकचरा संकलन व वाहतूक व्यवस्थेची नुकतीच पाहणी करण्यात आली. यात अनेक मोठ्या कॉम्पॅक्टर तसेच मिनी-कॉम्पॅक्टर वाहनांची अवस्था अत्यंत वाईट झाली असल्याचे निदर्शनाला आले.
ही वाहने वारंवार बिघाडाला कारणीभूत ठरत आहेत. परिणामी कर्मचारी व नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक सुरक्षितता, कर्मचाऱ्यांचे संरक्षण आणि अखंड कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या व कडक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
सर्व प्रभागांतील साहाय्यक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) आणि साहाय्यक अभियंता (वाहतूक) यांनी संयुक्तपणे त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व कचरा संकलन व वाहतूक वाहनांची सखोल यांत्रिक तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
केवळ यांत्रिकदृष्ट्या सक्षम व सार्वजनिक रस्त्यांवर सुरक्षितपणे चालण्यायोग्य वाहनेच वापरण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
जी वाहने खराब, असुरक्षित अथवा अयोग्य आढळतील, ती तात्काळ सेवेतून बाद करून रस्त्यावरून हटवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे अपघातांचा धोका कमी होणार आहे.
कोणत्याही खराब झालेले किंवा वाहतुकीसाठी योग्य नसलेल्या वाहनांचा वापर करण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या सूचना उपायुक्त किरण दिघावकर यांनी सहाायक अभियंत्यांना दिल्या आहेत.
तसेच अशा प्रकारच्या कचरा वाहनांमुळे (garbage truck) दुघर्टना किंवा अपघात झाल्यास त्याला संबंधित अधिकारी जबाबदार असेल, असेही नमूद केले आहे.
त्यामुळे कोणतेही खराब किंवा जुन्या वाहनाचा वापर कचरा टाकण्यासाठी होणार नाही, याची दक्षता पालिकेकडून घेण्यात येत आहे.
हेही वाचा