भारतीय हवामान विभागाने (IMD) आज सकाळी 10.15 वाजता कोकण प्रदेशासाठी पुढील तीन तासांकरिता तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा (heavy rain) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
कोकण प्रदेशात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे.
दरम्यान, मुंबईत (mumbai) रविवारपासून मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारी, हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवसांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मंगळवारी रात्रीही मुसळधार पाऊस सुरूच होता. गेल्या 24 तासांत अनेक भागांमध्ये 175 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचणे, रस्ते आणि रेल्वे वाहतूक मंदावणे आणि प्रवासी अडकून पडणे असे पावसाळ्यातील नेहमीचे दृश्य निर्माण झाले आहे.
मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत (मंगळवार सकाळी 10 ते बुधवार सकाळी 10) सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या हवामान केंद्रांमध्ये शहाजी नगर, ट्रॉम्बे (191 मिमी), महाराष्ट्र नगर, मानखुर्द (185 मिमी), एलबीएस मुलुंड चेक नाका (175 मिमी), टागोर नगर, विक्रोळी (145 मिमी), कलेक्टर कॉलनी, चेंबूर (163 मिमी), भायखळा अग्निशमन केंद्र (162 मिमी), नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल (143 मिमी), कांदिवली अग्निशमन केंद्र (138 मिमी), दिंडोशी अग्निशमन केंद्र (136 मिमी) आणि बीकेसी अग्निशमन केंद्र (139 मिमी) यांचा समावेश आहे.
महानगरातील पाणीटंचाईला दिलासा देत, मुंबई महापालिका (bmc) क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या कृत्रिम तलावांपैकी एक असलेला पवई तलाव आज पहाटे 5.30 च्या सुमारास ओसंडून वाहू लागला.
545 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या तलावातील पाण्याचा वापर केवळ औद्योगिक कामांसाठी केला जातो. मंगळवारपर्यंत मुंबईतील सात तलावांमध्ये केवळ 6.93 टक्के पिण्यायोग्य पाणी शिल्लक होते.
पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांतील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
या मान्सूनमध्ये आतापर्यंत मुंबईच्या कुलाबा (colaba) वेधशाळेत 510 मिमी, तर सांताक्रूझ वेधशाळेत 513 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, या हंगामात मुंबईत आतापर्यंत झालेला सरासरी पाऊस 20.41% आहे.
हेही वाचा