दक्षिण मुंबईत ५ मजली इमारतीचा भाग कोसळला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात एका ५ मजली इमारतीचा काहीस भाग कोसळला आहे. शुक्रवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. ही म्हाडाची  इमारत असल्याचं सांगण्यात येत आहे. या इमारतीतून रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. आतापर्यंत ३४ लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. याशिवाय ५ जण इमारतीच्या मलब्याखाली अडकल्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबईतील फोर्ट हा उच्चभ्रू परिसर आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकानं तातडीनं मदत आणि बचावकार्य सुरु केलं असून, नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीत दुरुस्तीचं काम सुरु होतं. ही इमारत काही वर्ष जुनी आहे. त्यामुळे आतल्या बाजूने डागडुजी सुरु होती. ही म्हाडाची इमारत असून, जिथे डागडुजी सुरु होती, तिथेच पडझड झाल्याची माहिती मिळत आहे.

या इमारतीचा तिसरा आणि चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. पडझड सुरु होताच ३४ रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. ते सर्व नागरिक सुखरुप आहेत. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. सध्या मुंबईत पावसाचा जोर नसला तरी जुन्या इमारतींना धोका कायम आहे.

मुंबई महापालिकेकडून जुन्या आणि धोकादायक इमारतींना नोटीस पाठवून, त्या रिकाम्या करण्याचे आदेश दिले जातात. आता ज्या इमारतीचा भाग कोसळला आहे, त्या इमारतीला अशा काही सूचना दिल्या होत्या का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या