मुंबईत २ महिन्यांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसहीत देशातील चार मेट्रो सिटीमध्ये साधारणत: २ महिन्यांनंतर शनिवार २१ नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ बघायला मिळाली. 

इंडियन आॅइल काॅर्पोरेशनने पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर १५-२० पैशांची वाढ केली असून डिझेलच्या दरांत प्रति लिटर २०-२५ पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर २२ सप्टेंबरपासून जैसे थे होते, तर २ आॅक्टोबरपासून डिझेलच्या दरांतही वाढ झालेली नव्हती. 

या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८७.७४ वरून ८७.९२ रुपयांवर गेला आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ७७.११ वरून ७६.८७ रुपयांवर गेला आहे. 

इंडियन आॅइल काॅर्पोरेशन कंपनी देशातील सर्वात मोठी तेल वितरण कंपनी आहे. इंडियन आॅइलकडून दररोज इंधनाचे दर ठरवण्यात येतात. इंडियन आॅइलसोबतच भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम काॅर्पोरेशन या प्रमुख तेल वितरण कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या पेट्रोल-डिझेल स्टेशनचं जाळं देशभरात पसरलेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची मागणी आणि पुरवठ्यावर इंधनाचे दर सातत्याने बदलत असतात. मागील काही महिन्यांमध्ये या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला मिळाले नसले, तरी या कंपन्यांनी हे दर स्थिर ठेवले होते. 

 कोरोना विषाणूवरील लस लवकरच बाजारपेठेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने व्यवहार सुरूळीत होऊ लागले आहेत. परिणामी इंधनाची मागणी देखील हळुहळू वाढू लागली आहे. त्याचे पडसाद देशातील इंधनाच्या दरांवर देखील पडताना दिसत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या