अतिक्रमण हटलं, पण पोलीस आल्यानंतर...

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दादर - मुंबई शहरातील दादरमधला शिवाजी पार्क हा तसा शांत परिसर. त्यामुळे तिथले निवासी आवाज,कलकलाट नेहमीच टाळताना दिसतात. सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या या विभागात याआधी तसे फेरीवाले,भाजीवाले दिसत नव्हते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शिवाजी पार्कजवळ असलेल्या एम.बी. राऊतच्या कॉर्नरला काही भाजीवाले रोज भाजीच्या गाड्या उभ्या करत होते. यामुळे इथं राहणाऱ्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. या त्रासाला कंटाळून अखेर इथल्या रहिवाशांनी पोलिसांना तक्रार केली.

या तक्रारीची पोलिसांनी दखल घेत गुरुवारी सकाळी शिवाजी पार्क परिसरातील अतिक्रमण हटवून रहिवाशांना रस्ता मोकळा करून दिला. विशेष म्हणजे फक्त शिवाजी पार्कच नव्हे तर शहरातल्या अनेक भागांमध्ये महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ठिकठिकाणी भाजीवाल्यांनी अतिक्रमण करुन नागरिकांच्या हक्काचे फुटपाथ लाटल्याचे चित्र मुंबईत पहायला मिळत आहे. महापालिकेने लक्ष घालून हे अतिक्रमण हटवावे, ही मुंबईकरांची तीव्र इच्छा आहे.

मात्र पालिका याकडे लक्ष देताना काही दिसत नाही. तसेच मुंबईमध्ये प्रत्येक विभागात पालिकेच्या भाजीमंडई आहेत. 'पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी असतात मग या भाजीवाल्यांवर कारवाई का होत नाही'? असा संतप्त सवाल रहिवाशांनी केला आहे. दरम्यान 'फ्रेश भाज्या विकण्याच्या नावावर हे भाजीवाले अतिक्रमण करत असल्याची प्रतिक्रिया पारुल परेरा यांनी दिली. तसेच भाज्यांच्या गाड्या लावल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगत पालिकेने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या