'पोलीस आपल्या दारी' उपक्रमाला चांगला प्रतिसाद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वडाळा - येथील कोरबामिठागर काळेवाडी पटांगणात पोलीस आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पोलिसांशी थेट संवाद हा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. स्थानिक पातळीवरील गुन्हेगार आणि वाढती गुन्हेगारी यावर नागरिकांच्या सहकार्याने कसा निर्बंध आणता येईल? महिलांवर होणारे अत्याचार कसे थांबवता येतील? यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

विभागातील समस्या जलद गतीने सोडवण्यासाठी प्रत्येक प्रभागात अथवा ज्या ठिकाणी सर्वाधिक गुन्हे घडतात अशा ठिकाणी एक पोलीस डायरी ठेवण्यात येणार आहे. त्यात नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवायच्या आहेत. ती डायरी मार्शल बिट पोलीस तपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे देतील. त्यानुसार त्या तक्रारींची नोंद करून निरसन करण्यात येईल

- परशुराम कार्यकर्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वडाळा पोलीस ठाणे

"गुन्ह्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र या वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेतल्यास विभाग, शहर, राज्य आणि राष्ट्र गुन्हेगारीमुक्त होण्यास वेळ लागणार नाही," असा विश्वासही या वेळी परशुराम कार्यकर्ते यांनी व्यक्त केला.

"वाईट संगतच नव्हे तर वाईट विचार देखील गुन्हेगार घडवतो. त्यामुळे चांगले वर्तन, चांगले विचार देण्यासाठी आपल्या मुलांशी जास्तीत जास्त सवांद साधणे गरजेचे आहे. तर पूर्वी मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्यात येत होते. परंतु त्या जागी आता पोलीस मित्र निवडण्यात आले असून त्यांच्या आधारे विभागातील गुन्ह्यांचा उत्तम मागोवा घेतला जात आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला दक्षता कमिटी काम करत आहेत. परंतु कोणताही अन्याय अत्याचार आपण सहन करतो म्हणून तो आपल्यावर होत असतो. तो सहन करण्यापेक्षा त्याला वाचा फोडणे गरजेचे आहे. महिलांनी हिम्मत करून जास्तीत जास्त तक्रारी पोलीस ठाण्यात मांडायला हव्यात," असा सल्ला परशुराम कार्यकर्ते यांनी दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या