प्रभादेवीतील रेल्वे पूल शुक्रवारपासून मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अटल सेतू आणि वरळी सी लिंक यांना जोडण्यासाठी या पुलाचे पाडकाम होणार आहे.
पुलाचे पाडकाम सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर, पुलाच्या मधोमध असलेले पश्चिम रेल्वेचे तिकीट आरक्षण कार्यालय देखील हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असून रेल्वेकडून त्यासाठी तयारी केली जात आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवसांत नवीन जागा निश्चित करून तिकीट आरक्षण कार्यालय हलवले जाणार आहे.
एप्रिल महिन्यात पूल वाहतुकीसाठी बंद करून पाडण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिकीट काउंटर आधीच दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र पुलाचे पाडकाम उशिरा झाल्याने हे स्थलांतर थांबले होते.
आता पुल वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा कार्यालय हलविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मध्य रेल्वेवरील परळ स्थानकातील तिकीट कार्यालय यापूर्वीच हलवण्यात आले आहे; तसेच लवकरच पश्चिम रेल्वेवरील स्थानकातील तिकीट आरक्षण कार्यालयही स्थलांतरित केले जाणार आहे.
हेही वाचा