रेल्वेचा आवाज तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो!

  • भाग्यश्री भुवड & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - दररोज रेल्वेतून लाखोंच्या संख्येने मुंबईकर प्रवास करतात. त्यामुळे त्यांची दगदगही तेवढीच होते. त्यातच रेल्वेच्या भोंग्याचा आवाज. या आवाजामुळे होणारे ध्वनीप्रदूषण मोजण्यासाठी आवाज फाउंडेशनने बुधवारी सर्व्हे केला. त्या सर्व्हेत काही स्टेशन्सवर होणारा आवाज 80 डेसिबलपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. 55 डेसिबल एवढा आवाज माणूस सहन करू शकतो. पण, रेल्वे परिसरात होणारा हा आवाज मानवी आरोग्यावर परिणाम करू शकतो. तसंच या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या आणि आवाज फाउंडेशनच्या संस्थापिका सुमायरा अब्दुलाली यांनीही पुढाकार घेत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्विट केलं. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली आहे.



सर्व्हेमध्ये सर्वात जास्त डेसिबल आवाज हा माहिम जंक्शन ( 97.7 ) आणि भायखळा स्टेशन (91.6 ) या दोन स्थानकांवर आढळून आला. नव्या लोकल्स जुन्या लोकल्सपेक्षा जास्त आवाज करतात, हेही यात नमूद करण्यात आले आहे. प्रवाशांचा आवाज, लोकलमध्ये गाणारी भजनी मंडळी, रेल्वेच्या घोषणा यातून निर्माण झालेला आवाज दररोज ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या जीवावर बेतू शकतो. या आवाजामुळे मानसिक तणाव, श्रवणशक्ती, ध्वनी प्रदूषण या सर्व परिणामांना प्रवाशांना सामोरं जावं लागतं.

आवश्यक असलेल्या सेवा कमी करु शकत नाही किंवा त्यामुळे होणारे ध्वनीप्रदूषण ही आम्ही टाळू शकत नाही. पण, ध्वनी प्रदूषण कमी करण्याकडे रेल्वे प्रशासनाचा कल असेल. 

- नरेंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना सुमायरा अब्दुलली यांनी ट्विटद्वारे ही माहिती कळवली आहे. पण, या माहितीवर अजूनही सुरेश प्रभूंकडून काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही, अशी माहिती आवाज फाउंडेशनच्या संस्थापिका सुमायरा अब्दुलाली यांनी दिलीय.

पुढील बातमी
इतर बातम्या