तुफानातही डगमगला नाही मुंबईकर!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

तुफान पावसाने मुंबईची दाणादाण उडवली. पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गावरच्या लोकल सेवेवरही परिणाम झाला. रल्वेसोबतच रस्ते वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली. रस्त्यांवर वाहनांची गर्दी, साचलेले पाणी यामुळे पायी चालणाऱ्यांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. पावसामुळे घरी जाण्याची सोय नसल्याने अनेक जण स्टेशन, रस्त्यांवर आणि कार्यालयातच अडकले. मात्र अशा आणीबाणीच्या परिस्थितीत मुंबईकरांनी एकमेकांना साथ देत खाण्या-पिण्याची सोय केली. अनेकांनी मुसळधार पावसात घराच्या बाहेर पडून कुणी बिस्कीट वाटप केले तर कुणी रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना फळांचे वाटप केले. 

एवढेच नाही तर अनेक मुंबईकरांनी सोशल मीडियाचा आधार घेत पावसात अडकलेल्यांसाठी राहण्याची देखील सोय केली. काही काळजी करू नका, आम्ही मालाडला राहतो. माझा एक मित्र माहिमला राहतो. या परिसरात अडकला असाल तर, आमच्या घरी या. तुमच्या जेवणापासून ते राहण्यापर्यंत सर्व काळजी आम्ही घेऊ, असे मेसेज सोशल मीडियावर पडू लागले. पावसात अडकलेल्यांसाठी पुन्हा एकदा मुंबईकर धावून आले आहेत. जात, धर्म या सर्वांपेक्षा माणुसकीच मोठी हे मुंबईकरांनी दाखवून दिले. 

परिस्थिती कुठलीही असो पण मुंबईचे स्पिरीट कठीण प्रसंगांमधून दिसून येते आणि याचा प्रत्यय आला तो मंगळवारी पडलेल्या तुफान पावसामुळे. खरेच मुंबईकरांच्या या स्पिरीटला आणि माणुसकिला 'मुंबई लाइव्ह'चा सलाम! 

पुढील बातमी
इतर बातम्या