पुनर्प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या पुरवठ्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठीचे पाणी स्वतंत्र जलवाहिनीद्वारे वितरीत करण्यात यावे, या मागणीचा विचार करत महापालिकेने पुनर्प्रक्रिया क्रिया केलेल्या पाण्याच्या वितरणासाठी स्वतंत्र जलजोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात राजभवनपासून केली जात आहे. 

बाणगंगा सांडपाणी प्रक्रीया केंद्रातून स्वतंत्र जलवाहिनी टाकून पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी दैनंदिन 3 लाख लिटर पाण्याची पुरवठा राजभवनला केला जाणार आहे. अशाप्रकारे सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रीया केलेल्या सांडपाण्याचा पुरवठा स्वतंत्र जलवाहिनीद्वारे करण्याचा हा मुंबईतील पहिला उपक्रम आहे. 

'डी' विभागातील बाणगंगा सांडपाणी प्रक्रिया केंद्रापासून ते राजभवनपर्यंत पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 159 मी. मी.व्यासाची जलवाहिनी टाकली जाणार आहे. राजभवनाकडून पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा केला जावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने बाणगंगा सांडपाणी प्रक्रीया केंद्रापासून 830 मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे तसेच चर बुजवायचे असल्यामुळे याचा समन्वय राखून ही जलवाहिनी टाकण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी सुमारे 67 लाख रुपये खर्च केले जाणार असून, यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.

राजभवनला पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी दरदिवशी 3 लाख लिटर्स पाण्याची आवश्यकता असते. त्यांनी केलेल्या मागणीनुसार 6 इंच व्यासाची जलवाहिनी टाकून त्याद्वारे बाणगंगा सांडपाणी प्रक्रीया केंद्रातील शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. मुंबईत अशाप्रकारे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकून वितरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जर मोठमोठ्या कंपन्यांनी तसेच हॉटेल्सनी सांडपाण्यावरील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी मागणी केल्यास, त्यांनाही स्वतंत्र जलवाहिनी टाकून त्याद्वारे या पाण्याचा पुरवठा केला जाईल, असे उपायुक्त रमेश बांबळे यांनी स्पष्ट केले.

प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या कंपन्या

रेसकोर्स आणि वेलिंग्टन क्लबकडून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर केला जातो. हे क्लब पंपिंगद्वारे हे पाणी घेतात. तर घाटकोपर पंपिंग स्टेशनमधून आरसीएफला प्रक्रिया न केलेल्या मलजलाचा पुरवठा केला जातो. आरसीएफ या पाण्यावर प्रक्रिया करून अन्य वापरासाठी त्याचा वापर करतो. परंतु स्वतंत्र जलवाहिनी टाकून पुनर्वापरासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुरवठा करण्याची ही पहिलीच वेळ असून, याची सुरुवात राजभवनपासून होणार आहे.

[ हे पण नक्का वाचा - राजभवनाखाली बंकर ]

 

पुढील बातमी
इतर बातम्या