'फेरीवाला झोन'वर सूचना-हरकती नोंदवा! राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालेली मनसे आता फेरीवाला झोन संदर्भात लोकांना हरकती व सूचना नोंदवण्याचं आवाहन करणार आहे. मुंबईतील ज्या ज्या रस्त्यांवर फेरीवाला झोन निश्चित करण्यात आला आहे, त्या त्या रस्त्यांवरील इमारती, सोसायटींमध्ये जाऊन तेथील रहिवाशांनी महापालिका कार्यालयात जाऊन हरकती व सूचना नोंदवण्याचं आवाहन करा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंज येथे घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. रहिवाशांनी नोंदवलेल्या या हरकतींची एक प्रत मनसे पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. या सर्व हरकतींचं निवेदन महापालिका आयुक्तांना सादर करेन, असंही, राज यांनी यावेळी सांगितलं.

राज यांच्या घरासमोरच फेरीवाल्यांना जागा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी सकाळी ११ वाजता कृष्णकुंज निवासस्थानी बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी मुंबतील हॉकर्स झोनबाबत महत्वाच्या सूचना केल्या. राज ठाकरे यांच्या घरासमोरील आणि मागील अशा दोन्ही रस्त्यांवर २० फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. एम. बी राऊत मार्ग आणि केळूस्कर मार्ग अशी या दोन रस्त्यांची नावं असून सध्या या दोन्ही रस्त्यावर एकही फेरीवाला बसत नाही. प्रसार मध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती.

म्हणून हाॅकर्स झोन होऊ शकत नाही

फेरीवाला क्षेत्राबाबत राज ठाकरे यांनी प्रत्येक सोसायटीला माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत त्यांची हरकत असेल तर ती महापालिका विभाग कार्यालय येथे नोंदवण्यास आणि त्याची एक प्रत आपल्याकडे घेण्यास संगितलं आहे. मात्र ज्या बातम्या आल्या आहेत ती यादी जुनी आहे. परंतु या दोन्ही मार्गावर १० फुटाचं फूटपाथ नाही. त्यामुळे इथं हाॅकर्स झोन होऊ शकत नाही. त्यातच सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि लोकांच्या हरकती व सूचना या आधारे हे दोन्ही रस्ते वगळले जाणार आहेत, असं मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या