मुंबईतील 'या' रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील केईएम, लोकमान्य टिळक रुग्णालय आणि जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे पडसाद राज्यात उमटले असून मुंबईतील निवासी डॉक्टरांनी आंदोलनास सुरूवात केली आहे. त्यानुसार गुरूवारपासून मुंबईतील महत्त्वाच्या अशा जे जे, लोकमान्य टिळक आणि केईएम रूग्णालयाती निवासी डॉक्टरांनी कोरोना सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद केल्या आहेत.

पदव्युत्तरच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे  नीटचे समुपदेशन रखडल्याने विद्यार्थी रुजू झाले नसून परिणामी निवासी डॉक्टरांवरील कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी देशभरातील निवासी डॉक्टर दिल्लीत आंदोलन करत आहेत.

गुरुवारी या आंदोलनाचा पहिला दिवस होता. जे जे रुग्णालय, लोकमान्य टिळक रुग्णालय आणि केईएम रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी या आंदोलनाचा फारसा परिणाम रुग्णसेवेवर झाला नाही. मात्र यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येणार असून पुढे रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच राहणार असून शुक्रवारी नायर रुग्णालयाचे निवासी डॉक्टरही या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळते. तर कोरोना सेवा सुरू ठेवण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढती असताना कोरोनाच्या रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सेवा बंद ठेवत शांततेत आंदोलन करण्यात येत आहे. कुठेही निषेध, निदर्शने करण्यात आली नाहीत. मात्र मागणी मान्य व्हावी यासाठी आंदोलन तीव्र करण्याची गरज असल्याने आंदोलनाची पुढील नेमकी दिशा काय असेल हे लवकरच जाहीर करण्यात येईल.

पुढील बातमी
इतर बातम्या