धार्मिक स्थळांत प्रबोधन, बाहेर समाजाची अडचण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला मखदूम अली माहिमी दर्गा अाणि सेंट मायकल चर्च यांना जोडणारा रस्ता अशी माहीम पश्चिमेकडील बालामिया मार्गाची ओळख आहे. या मार्गावर रहिवासी, प्रवाशांसोबत भाविकांची नेहमीच मोठ्या संख्येने वर्दळ असते. हे भाविक मोठ्या भक्तिभावाने गरीब, भिकाऱ्यांना दान करत पुढे जात असल्याने मागील काही वर्षांत परिसरामध्ये भिकाऱ्यांसोबतच गर्दुल्ल्यांची संख्याही कमालीची वाढली आहे. परिसर अस्वच्छ झाला. याचा साहजिकच रहिवाशांना त्रास होऊ लागल्याने या समस्येवर तोडगा काढायचा कसा? असा प्रश्न सर्वांना पडला. तेव्हा या रहिवाशांच्या मदतीला धावून आले 'माहीम दर्गा एएलएम'चे सदस्य. या एएलएमच्या सदस्यांनी लोकसहभाग आणि महापालिकेच्या मदतीने परिसर स्वच्छ तसेच सुंदर करता येईल, असा बहुमोल सल्ला बालामिया मार्गावरील रहिवाशांना दिला. त्यातून 2013 साली आकाराला आले 'बालामिया मार्ग एएलएम'.

'बालामिया मार्ग एएलएम'ची स्थापना झाल्यावर या 'एएलएम'ने महापालिका आणि पोलिसांच्या मदतीने सर्वात पहिल्यांदा पदपथांवरील अतिक्रमणे हटवली. वाहतूक पोलिसांनी जमा केलेल्या गाड्या बऱ्याच वर्षांपासून बालामिया मार्गावर उभ्या होत्या. त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. 'बालामिया मार्ग एएलएम'च्या सदस्यांनी वाहतूक पोलीस विभागाचा पाठपुरावा करून ही वाहने हटवल्याने रस्ता मोकळा झाला. आता या परिसरातील रहिवाशांना फेरीवाले, भिकारी आणि गर्दुल्ल्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्दैवाने अनेकदा पाठपुरावा करूनदेखील हा प्रश्न सुटू शकलेला नाही, अशी प्रतिक्रिया 'बालामिया मार्ग एएलएम'चे 62 वर्षीय अध्यक्ष ऑस्वाल्ड रॉड्रिग्ज यांनी दिली.

महापालिकेच्या माध्यमातून या परिसरातील रहिवाशांच्या पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या सोडवल्या जात आहेत. परंतु काही समस्या महापालिकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील आहेत. त्यामुळे सर्वच रहिवाशांचे समाधान करणे महापालिकेला शक्य नाही. तरीही याप्रकरणी उच्चस्तरीय बैठक घेऊन माहीम विभागातील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

मखदूम अली माहिमी दर्गा असो किंवा सेंट मायकल चर्च. या दोन्ही धार्मिक स्थळांमध्ये समाजाचे प्रबोधनही करण्यात येते. परंतु फेरीवाल्यांनी घेतलेला मोकळ्या रस्त्यांचा ताबा, पदपथांवर संसार थाटलेले भिकारी, कोपऱ्याकोपऱ्यात पडलेले गर्दुल्ले, अस्वच्छता याकडे पाहून धार्मिक स्थळी समाजाच्या भल्यासाठी प्रवचन आणि बाहेर समाजाचीच अडचण असे चित्र दिसून येत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या