चिंतेत वाढ! परदेशी प्रवाशांनी क्वारंटाइन टाळण्यासाठी शोधल्या पळवाटा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकार जन्माला आला असून, त्यानं ब्रिटनसह अनेक देशात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा नव्या कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी महापालिका प्रशासन व राज्य सरकारनं कंबर कसली आहे. ठिकठिकाणी चाचणी केद्र उभारले असून, मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी व त्यांना क्वारंटाइन केलं जात आहे. मात्र, ७ दिवसांचं क्वारंटाइन टाळण्यासाठी अनेक प्रवासी हे इतर राज्यांतील विमानतळावर उतरून महाराष्ट्र, मुंबईत येत आहेत. त्यामुळं चिंतेत वाढ झाली असून, प्रवाशांना रोखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

याबाबत माहिती मिळताच परदेशी प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्या-त्या विमानतळावर क्वारंटाइन करणं अत्यंत गरजेचं असल्याचं मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. ब्रिटन, युरोप, मध्य पूर्व व दक्षिण आफ्रिका या देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांची २१ डिसेंबरपासून मुंबई विमानतळावर तपासणी केली जात आहे. यापैकी महाराष्ट्राबाहेरील प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. तर अन्य प्रवासी मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहेत. 

हॉटेलमध्ये ७ दिवस राहणं परवडत नसलेल्या प्रवाशांच्या मागणीनुसार महापालिकेनं भायखळा येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये त्यांची विनामूल्य व्यवस्था केली आहे. ७ दिवसानंतर ज्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असेल, त्यांना घरी पाठवण्यात येत आहे. तर ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल त्यांच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात आहे.

२५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात आलेल्या प्रवाशांचाही शोध सुरू आहे. यापैकी मुंबईत ५ रुग्णांमध्ये ब्रिटनचा स्ट्रेन आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांचाही शोध घेण्यात येत आहे. परंतु, इतर राज्यांतील विमानतळावर उतरून देशांतर्गत प्रवास करीत महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचा शोध घेणं शक्य नाही. त्यामुळं मुंबई, महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी अन्य राज्यांतील क्वारंटाइनचे नियम कडक असावे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.

पुढील बातमी
इतर बातम्या