पर्यटकांनो, संध्याकाळी पाचनंतर भुशी डॅम बंद

  • मुंबई लाइव्ह टीम & वैभव पाटील
  • सिविक

जुलै महिना चालू झाल्यावर पावसाचा जोर वाढतो. त्यामुळं कधी एकदा धबधबे आणि भुशी डॅमवर जातो असं, प्रत्येक पर्यटकाला वाटत असतं. मात्र, भुशी डॅमकडे जाणारा मार्ग संध्याकाळी ५ वाजल्यानंतर बंद करण्याचा निर्णय लोणावळा पोलिस प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात पिकनीकसाठी जायचं कुठे? असा प्रश्न आता पर्यटकांना पडला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने घेतला निर्णय

पावसाळ्यात भुशी डॅमकडे जाणाऱ्या मार्गावर दर विकेंडला आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. भुशी डॅमवर येण्यासाठी प्रत्येक पर्यटक आपल्या गाड्या आणतात. त्यामुळं या मार्गावर वाहतूककोंडी होते. तसंच, भुशी डॅमकडे चालत जाणाऱ्या प्रवाशांचीही गर्दी जमते. परिणामी या मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना तासं-तास या मार्गावर अडकून राहावं लागतं. त्यामुळे सुरक्षेच्या कारणासाठी लोणावळा पोलीस प्रशासनानं संध्याकाळी पाच वाजल्यानंतर हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मद्यपान केल्यास कारवाई

लोणावळ्यातल्या भुशी डॅम आणि लायन्स पॉईंट या ठिकाणी पर्यटक नेहमीच मद्यपान करत असतात. काही पर्यटक महिलांची छेडछाड, अश्लील शेरेबाजी आणि धांगडधिंगा करतात. त्यामुळं या ठिकाणी आलेल्या इतर पर्यटकांना त्याचा त्रास होतो. मात्र, आता या ठिकाणी मद्यापान केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या