महापालिकेला बेअब्रू करणाऱ्या केळकर मार्गाचे काम अर्धवटच

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिकेचे प्रमुख रस्ते अभियंता संजय दराडे यांच्या हाती पाटी देऊन मनसेच्या नगरसेवकांनी त्यांना ज्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये उभे केले होते. त्या दादर पश्चिमेकडील न. चिं. केळकर मार्गाच्या डांबरीकरणाचे काम अर्धवट टाकून कंत्राटदाराने पळ काढला आहे. या मार्गावरील खड्ड्यांवरून महापालिका चांगलीच बेअब्रू झाली होती. मनसेच्या दोन नगरसेवकांना तुरूंगात जावे लागले होते आणि खड्ड्यांवरून राजकीय वातावरणही तापले होते. त्या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसेल, तर इतर रस्त्यांची काय अवस्था असेल, असा प्रश्न आता मुंबईकर उपस्थित करत आहेत.

दादर पश्चिमेकडील न.चिं. केळकर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे या रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे तत्कालीन नगरसेवक संदीप देशपांडे यांनी प्रशासनाकडे केली होती. परंतु प्रशासनाने त्यांच्या मागणीची दखल न घेतल्यामुळे संदीप देशपांडे, संतोष धुरी आदींनी रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांना सिटी मॉलसमोरील खड्डयात ‘या खड्डयाला मी जबाबदार आहे’, असे लिहिलेली पाटी देऊन उभे केले होते. कर्तव्यावरील अधिकाऱ्याला अवमानकारक वागणूक दिल्याप्रकरणी महापालिकेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी देशपांडे व धुरी या दोघांना अटक केली. याप्रकरणी दोघांनी तुरुंगवासही भोगला.

काम अर्धवट सोडून 10 ते 15 दिवस उलटले -
त्यानंतर न.चिं. केळकर मार्गाचे काम या मार्च-एप्रिल महिन्यात हाती घेऊन मे महिन्यात पूर्ण करण्यात आले. मुंबईतील सर्वच रस्त्यांची कामे ही 3 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश होते. परंतु 10 जून उजाडला तरी न. चिं. केळकर मार्गावरील शिवाजी मंदिरासमोरील काही भागाचे काम अर्धवट सोडले आहे. त्यामुळे येथे पावसाचे पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. कंत्राटदाराने प्लाझा सिनेमासमोर माहिमच्या दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यांचे कामही अर्धवट सोडले आहे. मुळात काम अर्धवट सोडून 10 ते 15 दिवस उलटून गेले आहेत. तरीही या अर्धवट रस्त्यांच्या कामांकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष गेलेले नाही.

कंत्राटदार काळ्या यादीतील -
विशेष म्हणजे हे काम करणारा कंत्राटदार काळ्या यादीतील आहे. या कंत्राटदाराला दिलेली कामे प्रशासनाने पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे न.चिं. केळकर मार्गावरील अर्धवट कामावरून पुन्हा रामायण घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाजी मंदिरसमोरील वृत्तपत्र विक्रेत्याने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. हे काम अर्धवट असल्यामुळे रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पाणी तुंबत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या