अनर्थ टळला! गर्भवती महिला ट्रेनखाली जाणार इतक्यात...

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

असं म्हणतात की देव प्रत्यक्ष दिसत नसला तरी, तो कोणच्या ना कोणाच्या रुपात येऊन लोकांना दर्शन देत असतो. एखादा अनर्थ घडणार असल्यास त्याला पुर्व कल्पना मिळणे किंवा काही संकट येणार असेल तर कोणाच्या मदतीनं आपल्याला वाचवलं जातं, असे अनेक प्रसंग आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र अशीच काहीशी घटना मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात घडली. रेल्वे स्थानकात गस्तीवर असणाऱ्या आरपीएफ जवानामुळं एका गर्भवती महिलेचा जीव वाचला.

कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानानं दाखलवेल्या सतर्कतेमुळं एका गर्भवती महिलेचा जीव वाचला आहे. जवानानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं एक मोठी दुर्घटना टळली. चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणारी महिला ट्रेनखाली जाणार इतक्यात जवानानं धाव घेत महिलेचा जीव वाचवला.

सोमवारी कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली. ही संपुर्ण घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे त्याप्रमाणे एक्स्प्रेस फलाटावर थांबली होती. यावेळी आरपीएफ कॉन्स्टेबल एस आर खांडेकर तिथेच उभे होते. एक्स्प्रेस सुरु झाल्यानंतर महिला चुकीच्या पद्धतीने उतरत असल्याचं लक्षात येता खांडेकर यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान महिला तोल जाऊन खाली पडली असता खांडेकर यांनी तिला तात्काळ बाजूला खेचत ट्रेनखाली जाण्यापासून वाचवलं. ही महिला गर्भवती होती. खांडेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेसह तिच्या बाळालाही जीवनदान मिळालं.

पुढील बातमी
इतर बातम्या