इमानच्या बहिणीविरोधात डॉक्टरांची लेखी तक्रार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जगातील सर्वात वजनदार महिला म्हणून ओळख असणाऱ्या इमानच्या उपचारांबाबतचा वाद आता विकोपाला पोहोचला आहे. इमानच्या उपचारांबाबत तिची बहीण आमचा सल्ला ऐकत नसल्याची आणि आमच्या कामात ढवळाढवळ करत असल्याची लेखी तक्रार सैफी रुग्णालयानं व्ही.पी.रोड पोलीस ठाण्यात केली आहे. इमानची बहीण शायमाच्या अशा वागणुकीमुळे इमानच्या प्रकृतीस धोका निर्माण होऊ शकतो, असंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

सैफी रुग्णालयाच्या दाव्यानुसार इमानचं वजन 500 किलोहून 176.6 किलो एवढं झालं आहे. तरीदेखील शायमाने सैफी रुग्णालय आणि इमानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर अनेक आरोप केलेत. इमानला सध्या नळीद्वारे आहार दिला जातो. पण डॉक्टरांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून शायमाने इमानला थेट तोंडाद्वारे पाणी दिले. शायमाच्या या आणि अशा वागणुकीला कंटाळून सैफी रुग्णालयाने शायमाविरोधात गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास व्ही.पी.रोड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीत शायमा डॉक्टरांच्या उपचार पद्धतीचं उल्लंघन करत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

तर, डॉक्टरांनी लावलेले आरोप शायमाने फेटाळून लावले आहेत. ती म्हणते की, इमान पाणी पिऊ शकत नाही हे मला डॉक्टरांनी सांगितले नाही. इमानला पाणी हवे होते म्हणून मी तिला पाणी दिले. तर, याविषयी शायमाला पूर्ण कल्पना असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या