डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पाणी बचतीचा संदेश

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

'पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्व जाण' या ओळी आजच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीला तंतोतंत लागू होणाऱ्या अशा आहेत. दादर-नायगाव मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ 5 - अ च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक विषय घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी 'पाणी वाचवा' चा संदेश देण्यारा देखावा साकारला.

शहरांमध्ये पाण्याची पुरेशी उपलब्धता आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मुबलक पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीत पाण्याच्या एकाएका थेंबाचे महत्त्व आजच्या पिढीला समजावे, तसेच येत्या काळात पाण्यासाठी पेटणाऱ्या युद्धावर मात करण्याच्या उद्देशाने मंडळाच्या वतीने हा देखावा साकारण्यात आला आहे. मंडळाने आजवर स्त्री भ्रूण हत्या, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जनजागृती आदी विषय घेऊन समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. यंदा मंडळाचे 55 वर्ष असून 'पाणी वाचवा' ही संकल्पना अरविंद कांबळे यांनी साकारली. पेपर आणि बांबूच्या सहाय्याने साधारण 20 फूट उंचीची पृथ्वी आणि त्याला जोडलेला नळ अशी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यासाठी गेल्या दहा दिवसांपासून मंडळाच्या वतीने तयारी सुरु होती. तर नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी 16 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत आर्ट क्रिएशन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यात मातीचे मडके तयार करण्याचे प्रशिक्षण, पेन्सिल स्केचिंग, मूर्ती काम, लँडस्केप पेंटिंग, नेचर पेंटिंग आदी प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या